दुपारी चारच्या दरम्यान
इन्स्पेक्टर पाटलांच्या केबिन वर टकटक झाली.
"प्लिज कम इन, राऊत."
समोर सबइन्स्पेक्टर राऊतांना बघून एवढ्या दुपारी पण इन्स्पेक्टर
पाटलांना आशेचा गारवा झोंबल्यागत झालं
"मग कशी काय झाली
शोधाशोध?"
"सर, अमित च्या घरात
संशय घेण्यासारखं काही सापडलं नाही. त्याची बँक अकाउंट्स, सेविंग्स
ह्याबद्दलची कागदपत्रं मिळाली आहेत आणि ती बाहेर साळुंखे कडं तपासासाठी दिली
आहेत. त्याच्या बेडरूमच्या कपाटाच्या आतल्या कप्प्यात हि एक हार्ड डिस्क
मिळालीय. बरीच आत मध्ये लपवून ठेवलेली दिसली. बघुयात यात काही मिळतंय का?"
इतक्यात इंस्पेक्टरांच्या
टेबलावरचा फोन खणखणला. डाव्या हातानं आपला लॅपटॉप राऊतांच्या
हातात देऊन हार्ड डिस्क कनेक्ट करण्याचा इशारा करत उजव्या हाताने त्यांनी
फोन उचलला.
"सर, रिसॉर्ट जवळच्या
लोकांशी विचारपूस केल्यावर कळलं कि त्या दुपारी दोन अडीच च्या सुमारास
एका रिक्षेतून एक मुलगी रिसॉर्ट पर्यंत आली होती. आम्ही माग काढत त्या रिक्षावाल्याला पकडला. मयत बाईच्या अंगावरचे कपडे आणि त्या रिक्षावाल्यानं सांगितलेले कपडे मॅच होतायत
सर."
"त्याला इकडं
पोलीस स्टेशन ला बोलवा आणि स्केच आर्टिस्ट ला बोलावून बाईचं स्केच
बनवून घ्या."
"ठीक आहे सर.
आत्ताच घेऊन येतो त्याला."
फोन ठेवून झाल्यावर
पाटलांनी साबिन्स्पेक्ट राऊतांना विचारलं, "राऊत त्या एस्कॉर्ट एजन्सीचं काय झालं? कुणी बाई किंवा मुलगी गायब आहे का?
"अरे हो सर, मगाशीच त्यांना फोन केलेला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार कुणीच गायब नाहीये. तरी पण मी आपली माणसं पाठवलीयत. एकदा लॉक अप
मध्ये घेऊन त्याची खबरबात घ्यायला पाहिजे. हि असली माणसं उगाच पोलिसांचं लफडं नको म्हणून कुणी गायब असेल तरी पण खोटं सांगू शकतात. शेवटी काय आहे ना सर, माणूसकी नसलेली
माणसांची जमात पण आहेच की जगाच्या पाठीवर. म्हणूनच कुणावर विश्वास ठेवून
नाहीच चालत."
"हम्म... चांगला
धुवून काढा त्याला, आणि एजन्सीमधल्या एक दोन मुलींची स्टेटमेंट पण घ्या."
"हो सर."
त्यानंतर जवळपास अर्धा
तास दोघेही लॅपटॉप मध्ये डोकं घालून हार्ड डिस्क मधील एक एक फाईल तपासत
होते. बर्याचश्या फाईल्स मध्ये अग्रीमेंटस, अमितच्या
सेविंग्स संदर्भातले पासवर्ड्स अश्या बऱ्याच गोष्टी होत्या.
एका तासानंतर एका
फोल्डर पाशी मात्र ते थांबले. त्या फोल्डर मध्ये बरेच फोटो होते... त्याच्या आणि
ईशाचे ट्रिप्स चे फोटो, अनिशचे फोटो... पण ह्या फोल्डरमध्ये
आणखी एक सबफोल्डर होता. तो उघडल्यावर मात्र इन्स्पेक्टर पाटील जागेवरच उडाले. त्यात अमितचे आणि शांभवीचे नको त्या अवस्थेतील बरेच फोटो होते, जवळपास पन्नास एक फोटो तरी सहज असावेत.
"हा अमित फक्त
बाईलवेडा नाही तर आणखी बराच काही आहे." राऊत आश्चर्यानं म्हणाले.
"थोडं स्क्रोल
करून बघ राऊत, फक्त मिसेस सरपोतदारांबरोबरचे फोटो आहेत कि आणि आणखी दुसऱ्या कुणाला पण भक्ष्य
बनवलंय त्यानं."
राऊतांनी जवळपास सगळे फोटो परत परत
पहिले, संपूर्ण डिस्क दोन वेळा डोळ्याखालून घातली.
"नाही सर, फक्त आणि फक्त
मिसेस सरपोतदार यांच्या बरोबरचे फोटो आहेत ह्यात."
"म्हणजे ह्याचा अर्थ असा होऊ शकतो कि ह्या अमितनं शांभवीला आपल्या जाळ्यात ओढलं आणि तिचे स्वतःबरोबरचे असले फोटो काढून तो तिला blackmail करत असावा, कदाचित
पैश्यासाठी "
"आणि म्हणूनच त्या दिवशी शांभवी अमितला भेटायला रेसोर्ट मध्ये गेलेली होती. नातं संपवायला जाणं वगैरे सगळं झूठ आहे. ती कदाचित त्याला पैसे द्यायला गेली असेल.."
"राऊत, साळुंखेंना
अमितबरोबर शांभवीचे अकाउंट डिटेल्स पण द्या."
"बर सर."
राऊत बाहेर निघायला उठले. त्यांना थांबवत इन्स्पेक्टर पाटील म्हणाले,
"आणि जेवून घ्या
थोडं. आज काहीतरी लीड मिळालीय केस ला. जेवण नक्की गोड लागेल."
राऊत बाहेर गेल्यावर त्यांनी सर्व
प्रथम रिसॉर्ट मध्ये असलेल्या आपल्या टीम ला फोन केला.
"काय शिंदे, माश्या मारताय
कि काय तिकडं बसून? कि झोप काढताय? सकाळी गेलाय, अजून पर्यंत फोन नाही केलात तुम्ही."
"सर, ते... मगाशी मी
आणि कदमांनी मिळून रिक्षावाल्याचा शोध लावला. कदम स्टेशनकडं यायला निघालाय आणि मी
आता रेसॉर्टच्या मागच्या भागाची तपासणी करतोय."
"मग काही मिळालं
का?"
"सर, रिसॉर्टच्या
मागच्या बाजूला तारेचं कुंपण आहे आणि बरीच झुडुपं पण वाढलेली आहेत. एका
बाजूला तारेचं कुंपण वाकवण्यात आलाय आणि झुडुपं पण चेंगरलेली दिसतायत. असं
वाटतंय कि त्या बाजूनं कुणीतरी आत घुसलं असावं."
"शक्य आहे. फोटो काढा
त्या जागेचे आणि मला पाठवा. बरं आणखी काही सापडलंय का?
"तारेच्या
कुंपणावर एक कपड्याचा तुकडा सापडलाय. कदाचित खुनी आत घुसत असताना त्याचे कपडे
तारेत अडकून फाटले गेले असतील."
"ताब्यात घ्या तो
आणि डॉक्टर शहांकडे पाठवून द्या."
एक कडक चहा मागवून
इन्स्पेक्टर पाटील थोडा वेळ शांत बसले. रोज इतक्या केसेस हाताळून
डोक्याला मुंग्या आल्यासारखं व्हायचं. त्यामुळं पाटील दिवसातून दोन वेळा तरी सगळे विचार डोक्यातून झटकून पंधरा मिनिटं शांतपणे डोळे मिटून बसत. या पंधरा मिनिटात कुठल्याही केस चा ते विचार करत नसत. त्यांच्यासाठी हा एक प्रकारचा पॉवर नॅप होता. आज पण पंधरा मिनिटांनी जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांना बराचसं शांत वाटलं.
ड्रॉवर मधून कोरा कागद काढून
त्यांनी अमित मर्डर केस ची थेरी मांडायला सुरुवात केली.
१. शांभवी हा prime
suspect असू शकतो कारण एक तर तिचे अमितशी विवाहबाह्य संबंध होते. अमितसाठी जरी हा खेळ असला
तरी शांभवीच्या बोलण्यातून असं वाटत होत कि तिनं त्याच्यावर मनापासून प्रेम केलेलं
होतं . असं असताना जेव्हा अमितनं तिला त्यांचे अश्या अवस्थेतले फोटो दाखवून
ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला असेल तेव्हा तिनं त्याचा खून केला असेल.
२. अथर्व हा देखील
खुनी असू शकतो. आपल्या बायकोचे अनैतिक संबंध आहेत हे समजल्यावर एका
दगडात दोन पक्षी मारण्यासाठी त्यानंच अमितचा खून करून शांभवीवर आळ
यावा अशा पद्धतीनं डाव रचला असेल. किंवा असे ही होऊ शकते कि अमित शांभवीला नाही तर
अथर्वला ब्लॅकमेल करत असावा.
अथर्व आणि शांभवी या
दोघांनी मिळून अमितचा काटा काढला नसेल हे कशावरून? अथर्वचं बिझिनेस स्टेटस आणि शांभवीचं चारित्र्य ह्या दोन्ही गोष्टी समाजापुरत्या तरी शाबूत राहतील असा विचार करून ह्या दोघांनी मिळून खून केला असेल. नाहीतरी डॉक्टर शहा म्हणत होते कि एका पुरुषाचा सहभाग असू शकतो.
३. राहता राहिली इशा तर ते प्रकरण
अगदीच सरळ आहे. नवऱ्यानं फसवलं म्हणून त्याला मारून शांभवीवर आळ आणला कि झालं .
आता राहता राहिला व्यावसायिक अँगल
तर उद्या अमितच्या ऑफीस मध्ये जाऊन यायला पाहिजे.
एवढं सगळं झालं तरी ती मेलेली
स्त्री कोण हे अजूनपर्यंत कळलेलं नाहीये. लीड मिळालीय पण बघूया हा खडा लागतोय का
ते.
"सर, तो रिक्षावाला आलाय
बाहेर." कुणीतरी येऊन वर्दी दिली. लागलीच पाटीलांनी त्याला आत बोलावलं.
"काय रे, नाव काय तुझं?"
"साहेब, मी
प्रसाद."
"किती
वर्षांपासून रिक्षा चालवतोस?"
"झाली असतील पाच
वर्षं साहेब."
"हम्म.. तर तुझं
म्हणणं आहे कि तू एका मुलीला त्या दिवशी ग्रीन वाईल्ड रेसोर्ट पर्यंत सोडलंस
."
होय साहेब. एक विशीतली मुलगी त्या
दिवशी दुपारी दोन सव्वा दोनच्या दरम्यान शांती चौकात आली. तिथूनच तिनं माझी रिक्षा
घेतली."
"आणि शांती
चौकापर्यंय ती कशी आली?"
"माहित नाही
साहेब. पण त्याच दरम्यान एक बस येते चौकात. त्या बसमधनंच उतरली असेल."
"दिसायला कशी
होती ती मुलगी?"
"ठीक ठाक होती
साहेब. मध्यमवर्गीय घरातली वाटत होती. कपडे पण साधेच होते."
"काय कपडे घातले
होते तिनं ?"
"चुडीदार घातलेला
साहेब, लाल रंगाचा. पिवळ्या रंगाची सलवार आणि ओढणी होती."
"चेहरा लक्षात
आहे का तिचा?"
"हो सर, दोन
दिवसापूर्वीची तर गोष्ट आहे."
"रिक्षात
बसल्यावर कुठला फोन वगैरे आला होता का तिला? किंवा तुझ्याशी
काही बोलली का?"
"नाही सर, फोन काय आला
नव्हता. रिक्षात बसल्यापासून ती तिच्या मोबाईल मध्ये काहीतरी बघत होती. कदाचित
त्या एरियात पहिल्यांदा आली असेल कारण मला सारखं काही ना काही विचारात होती"
"नक्की काय
विचारात होती, स्पष्ट सांग."
"म्हणजे असं कि, इकडून रेसोर्ट किती लांब आहे, किती वेळ लागतो? हा भाग एवढा
सुनसान का आहे? इथून रात्री परत जायची काही सोय आहे का? असल्यास कसं
जायचं ? तुम्हाला फोन केला तर तुम्ही मला परत न्यायला येणार का?"
"मग तू काय
सांगितलंस?"
"मी नाही म्हणून
सांगितलं साहेब, एक तर मी पहाटे चार पासून रिक्षा चालवतो. रात्री उशीरपर्यंत एवढ्या थोड्या अंतरावरच्या भाड्यासाठी थांबून काय करू? रात्री आठ नंतर
त्या भागात कुत्रं पण दिसत नाही."
"बर , तुला कुठली गोष्ट
खटकली का?"
"म्हणजे.. हो
साहेब. म्हणजे असं बघा, ती मुलगी अगदी सध्या घरातली वाटत होती पण तिच्याकडं लई महागडा मोबाइल
होता."
"आणखी काही?"
"नाही
साहेब."
"बरं तू बाहेर जा, आणि त्या मुलीचं
वर्णन सांग. तिचं चित्र बनवलं जाईल. आणि हो, बाहेर तुझा फोन
नंबर पण देऊन जा. लक्षात ठेव, तुझ्यावर लक्ष आहे आमचं. कुठं पळून
वगैरे..... "
"सर, मी कशाला पळून
जाऊ? मी काही केलेलंच नाहीये. मला माझं घर दार आहे, बायका पोरं
आहेत. असं लांडी लबाडीनं पैसं कमवायचं असते तर रिक्षा नाही चारचाकी गाडीतनं फिरलो
असतो आत्तापर्यंत."
"बरं जा तू. कदम, ती मुलगी शांती
चौकापर्यंत कुठून आली ह्याची माहिती काढा"
"हो सर."
रिक्षा ड्राइव्हर बाहेर निघून
गेल्यावर रोजच्याप्रमाणं इन्स्पेक्टर पाटलांनी डॉक्टर शहांना फोन केला.
"बोला डॉक्टर, आजच्या दिवसात
काय प्रगती?"
"नमस्कार
इन्स्पेक्टर पाटील, मला तुमचं हेच आवडतं बघा, तुमची केस माझ्या हातात आली कि न
चुकता तुम्ही दररोज संध्याकाळी मला फोन करता."
"अरे म्हणजे काय? तेचं तर काम आहे
आपलं. बरं ते जाऊदे, आधी मला सांगा कि माझ्या टीमनं तुमच्याकडं तो कापडाचा तुकडा पाठवला कि नाही?"
हो. म्हणजे काय? तासाभरापूर्वीच
मिळाला मला तो तुकडा?"
"मग काय म्हणतोय
तो तुकडा?"
"इन्स्पेक्टर, हा एक
पॉलिस्टरच्या कापडाचा तुकडा आहे, पिवळ्या रंगाचा. हे कापड
....."
डॉक्टरांचं वाक्य मध्येच
तोडत इन्स्पेक्टर म्हणाले, ".....सहसा चुडीदारवरच्या ओढणीचं असतं आणि असलीच
ओढणी मयत स्त्रीच्या अंगावर होती. "
"अरे वा पाटील, तुम्ही काय
ज्योतिषी झालात कि काय?"
गडगडाटी हसत इन्स्पेक्टर म्हणले..
"आणि त्या वळूंची सॅम्पल्स पण जुळली असतीलच."
"हो. पण कुठली
वाळू आहे ती?"
"मि.
सरपोतदाराच्या बंगल्या जवळच्या समुद्रकिनाऱ्याची."
"म्हणजे तुम्हाला
खुनी मिळालाय तर?"
"नाही अजून, पण संशय गडद
होताहेत. बरं, आणखी काही सापडलं का आजच्या चाचण्यांमध्ये?"
"मी तुम्हाला
म्हटलेलं ना कि कुठल्यातरी दगडानं त्या बाईचं डोकं चेचलंय, तो दगड नसून
एखादी संगमरवरी मूर्ती असावी."
"कशावरुन?"
"संगमरवराची
बारीक पूड मिळाली आहे जखमांमध्ये आणि तीच पूड बाथरूममध्ये पण आहे,"
"अच्छा. आणखी
काही?"
सध्या तरी नाही इन्स्पेक्टर. काही
सॅम्पल्स टेस्ट साठी पाठवलेत. उद्या पर्यंत कळवतो तुम्हाला."
"थँक्स"
इन्स्पेक्टर पाटलांना आज
दिवसभरात काहीतरी मिळवल्यासारखं वाटलं. एकूणच आजच्या दिवसाचा गोषवारा पाहता
शांभवी अमितला भेटून निघून गेली असावी. त्यांच्यात पैश्याच्या
बाबतीत किंवा दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टींमुळं बाचाबाची झाली असावी. ती निघून
गेल्यावर अमितनं दुसऱ्या कुठल्यातरी बाईला रेसोर्ट मध्ये बोलावलं असेल.
ती बाई दुपारी सुनसान असणाऱ्या त्या भागात मागच्या बाजूने आत शिरली असेल.
इकडे घरी येऊन शांभवीनं रागाच्या भरात अमितला संपवायचं असा विचार करून
अमितला फोन करून तळ्यापाशी बोलावलं असेल. लपून रेसोर्टच्या आत शिरून तिनं आणि कदाचित तिच्या बरोबर असलेल्या अथर्वनं मिळून अमितचा खून केला असेल. पुरावा मोबाईल मध्ये असेल असा विचार करून त्याचा फोन काढून घेतला
असेल पण कदाचित कुठलाच पुरावा तिकडं न मिळाल्यानं ते अमितच्या कॉटेज मध्ये
शिरले असतील. आतमध्ये एका बाईला बघून तिलाहि संपवलं असेल आणि तिचा फोन घेऊन
पळून गेले असतील. पण मग ती संगमरवरी मूर्ती कुठून आली? जर ह्यांच्या हाताचे ठसे कुठंही मिळाले नाहीत ह्याचा अर्थ ग्लोव्हज घातले असतील. असं असताना ती अवजड वस्तू धुवायची काय गरज होती? जर ती लपवायची
असेल तर ती जशीच्या तशी बाहेर घेऊन शकले असते. मिळालेली काही उत्तरं अनेक प्रश्नांना जन्म देत होती.
मि. सरपोतदार हे शहरातील मोठं
प्रस्थ असल्यानं आत्तापर्यंत ते एक ठोस पुरावा मिळण्याची वाट पहात होते. जर गडबडीत अथर्व वर संशय घेतला असता तर त्यानं नाही म्हटलं तरी उगाच नवनवे प्रॉब्लेम्स उभे केले असते. पण आजच्या दिवसात त्यांनी अथर्वला त्याच्या बायकोचं खरं रूप सांगून अर्धा मारलेला होता आणि ह्या फोटोच्या पुराव्यानिशी ता अथर्वला हालचाल करायला काहीच जागा नव्हती. उद्या सकाळी मि सरपोतदारांच्या घरी सर्च वॉरंट घेऊन जायचं आणि परत येउन एकेकाला interrogation साठी बोलवायचं
असा विचार करत त्यांनी आपली पोलीस कॅप उचलली .
बाहेर बघितलं तर संध्याकाळ झाली
होती. उद्या काही नवीन उत्तरं मिळवायची असा विचार करून
ते घरी निघण्यासाठी बाहेर निघाले.