Sunday, November 25, 2018

मी आज अनुभवलेला 'ठग ऑफ हिंदुस्थान'

माझं ऑफिस घरापासून २० किमी वर आहे आणि तिथपर्यंत पोहोचायला स्कूटर वरून ४५ मिनिटं लागतात. तर आज सोमवार असल्यानं अगदी जीवावर येऊन उठून, आवरून सकाळी ऑफिसला माझ्या स्कूटर वरून येत होते.ऑफसच्या रस्त्यावर एक सिग्नल लागतो आणि तो पार केला तर जवळपास ५ किमी पर्यंत जंगलासारखा एअर फोर्स चा भाग आहे जिथं आजूबाजूला काहीच नाही. तर त्या सिग्नल वरून १ कमी पुढं पर्यंत पोचले असताना दोन माणसं त्यांच्या दुचाकीवरून आली आणि माझ्या स्कूटर च्या मागच्या चाकाकडं खुणा करून काहीतरी सांगू लागली. कधी आपली ओढणी चुकून निसटली असेल तर ती चाकात जाऊ नये म्हणून बरेच जण खुणा करून ती व्यवस्थित घ्यायला सांगतात, पण मी तर आज ओढणी घेतलीच नव्हती. कदाचित मागच्या चाकातली हवा कमी झाली असेल किंवा ते पंक्चर झाले असेल आणि हेच सांगण्याचा ती माणसं प्रयत्न करीत असतील अश्या विचारानं मी बाजूला गाडी थांबवली आणि काय झालं हे त्यांना विचारलं. त्यांनी पण माझ्या शेजारी गाडी थांबवली आणि  तेलुगू मध्ये एकदम पॅनिक होऊन म्हणू लागले, "तुम्हाला काय ऐकू येत नाहीये का? दोन किमी पासून आम्ही तुम्हाला बोलावतोय."
तो पर्यंत मी खाली उतरून मागचं चाक बघितलं तर हवा वगैरे सगळं ठीक वाटत होतं . मी त्यांना म्हटलं नक्की काय झालंय? तर परत (तेलगू मध्येच) म्हणायला लागले कि जर अजून थोडा वेळ गाडी अशीच चालवली असती तर गाडीला आग लागली असती. म्ह्णूनच  तुम्हाला थांबवायचा प्रयत्न करतोय तर तुम्ही तसंच पुढं चाललाय.
मी सगळ्यात आधी म्हटलं कि मला तेलगू कळत नाही तेव्हा काय ते स्पष्टपणे हिंदी नाहीतर इंग्लिश मध्ये सांगा. तर त्यातला एक जण बोलला, "तुमच्या गाडीच्या पाठीमागं स्पार्क येतोय."
हे ऐकून खरं तर क्षणभर मी  घाबरले. एक तर आपल्याला गाडीमधलं जास्त काही कळत नाही. आत्तापर्यंत ब्रेक केबल तुटली, पंक्चर झालं या पलीकडे जाऊन माझ्या गाडीनं मला कधीच धोका दिलेला नव्हता आणि त्यामुळं हा नवा प्रॉब्लेम (तो पण स्पार्क, गाडी जळेल वगैरे) ऐकून मी घाबरले. परत गाडी सुरु केली आणि खरंच काही झालं तर काय करायचं ह्या विचारानं गाडी पण सुरु करावीशी वाटेना. तरी पण त्या माणसाला म्हटलं, "तुम्ही एकदा गाडी सुरु करून दाखवा बरं, मी बघते कुठं स्पार्क येतोय ते." तर हा लगेच पुढं आला आणि म्हणाला, "तुम्ही थांबा, गाडी थोडी कडेला लावा. मी बघतो नक्की काय झालंय  ते. मी पण मेकॅनिकच आहे आणि म्हणूनच मला कळलं कि काहीतरी लोचा आहे. तुम्हाला गाडीमधनं काही विचत्र आवाज ऐकू आला नाही का?" मी म्हटलं नाही आला तर  तो म्हणाला, "कदाचित हेल्मेट घातल्यानं ऐकू आला नसेल. तुम्ही एक काम करा, गाडी त्या बाजूनं  थोडी आडवी करा, आणि मला एक कापड द्या, मी बघतो नक्की काय झालंय ते." असं म्हणत स्वतःच्या हातातलं एक कापड घेऊन तो गाडीच्या उजव्या बाजूला वाकला पण. मी गाडीच्या डाव्या बाजूला जाऊन गाडी एका बाजूला झुकवली आणि कापड काढून देऊ लागले. तेवढ्यात तो माणूस म्हणाला, "मॅडम इकडं या, बघा हि पाईप निघून गेलीय." मी खाली वाकून बघितलं तर सायलेन्सर च्या वरच्या भागात असणारी एक पाईप गायब होती. गाडीची इतकी माहिती नसल्यानं नक्की काय झालाय हे मलाही कळेना. तेवढ्यात तोंडातून थोडी थुंकी माझ्या सायलेन्सर वर लावून त्यानं म्हटलं "बघा मॅडम, सायलेन्सर किती गरम झालाय. आणि आता ह्या पेट्रोलच्या पाइपमधनं जर पेट्रोल खाली सायलेन्सरवर पडलं आग नाही का लागणार?"
एक तर पेट्रोलची पाईप सायलेन्सरवर असू शकत नाही हा common sense चा भाग आहे. दुसरं म्हणजे गाडीतलं पेट्रोल तर कमी झालेलं वाटत नव्हतं. जर हि पाईप कुठं पडून गेली असेल तर धबाधबा पेट्रोल वाहून गेल्यानं आत्तापर्यंत पेट्रोलची टाकी रिकामी व्हायला हवी होती. एका बाजूला तो सांगतोय हे चुकीचं आहे असं वाटत होतं तर दुसऱ्या बाजूला "काय माहित, खरं सांगत असेल तर गाडी सुरु केल्यावर accident होईल" ह्याची भीती पण वाटत होती. 
मी त्याला म्हटलं "ठीक आहे, मी गाडी ढकलत पुढच्या एका सर्विसिंग च्या दुकानात घेऊन जाते आणि ठीक करून घेते, तुम्ही जावा." तर तो म्हणाला, "एवढं कशाला मॅडम, हा (त्याच्याबरोबरच्या माणसाकडे हात दाखवून) गाडीवरून जाऊन ती पाईप घेऊन येईल. तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही चालत जाऊन घेऊन या. मी नक्की काय घेऊन यायचं ते सांगतो. पण मॅडम, तुम्ही इतक्या लांब चालत जाऊन येईपर्यंत खूप वेळ लागेल, तुम्ही त्याला पैसे द्या, तो घेऊन येईल. हवं तर बिल पण आणून देईल." मी म्हटलं, "अंदाजे किती पैसे होतील? तर तो म्हणाला, "मॅडम पाच-सहाशे होतील."
त्यावेळी मला थोडी शंका आली. मी विचारलं, "इतके पैसे?' तर म्हणाला, "मॅडम, कॉपर ची पाईप असते त्यामुळं तेवढे पैसे लागतातच. हवं तर तुम्ही पण ह्याच्या बरोबर जावा." मला त्याच्याकडं पैसे द्यायला पण नको वाटू लागलं आणि गाडी इथं अशीच ठेवून जायची पण भीती वाटू लागली. मनात म्हटलं, 'काय व्हायचं ते होऊ दे, आपणच आपल्या गाडीवरून जाऊ. जवळजवळ १०-१२ किमी गाडी चालवली पण इतका वेळ स्पार्क मुळं काही झालं नाही, बघूया आता काय होतंय ते.' असा विचार करून गाडी सुरु करायला गेले तर गाडी पण सुरु होईना.
सगळ्यात आधी नवऱ्याला फोन केला, काहीबाही मराठीतून बोलल्यासारखं केलं आणि त्या माणसाकडं बघून सांगितलं कि "तुम्ही इथंच थांबा, माझा नवरा इथून ४ किमी च्या अंतरावर आहे आणि तो ५ मिनिटात इथं येईल. तो आल्यावर कसली पाईप आणायची ते सांगा, तो घेऊन येईल आणि तुम्ही ती बसवून द्या हवं तर." असं म्हटल्या म्हटल्या दोघांनी गाडीवर टांग टाकली आणि म्हणाले, "जर तुमचा नवरा येणार असेल तर ठीक आहे, तुम्ही काय ती दुरुस्ती करून घ्या, आम्ही निघतो." एवढा वेळ माझी आणि माझ्या गाडीची इतकी काळजी असल्याचं दाखवणारा आणि गाडी दुरुस्ती साठी अजून  तास भर पण थांबू शकतो असा अविर्भाव असलेला तो माणूस दोन मिनिटांत गायब झाला.
तो निघून गेल्यावर मी नवऱ्याला झालेला सगळा वृत्तांत सांगितलं. त्या माणसानं 'गाडीला काय झालंयहे बघायचं नाटक करून ती पाईप काढून घेतली असेल हि शंका पण व्यक्त केली. नवरा खूप दूर त्याच्या ऑफिसपाशी असल्यानं येण्याचा प्रश्नच नव्हता. मग मी मागं वळून गाडी १ किमी ढकलत नेण्याचा निर्णय घेतला. अर्धा तास गाडी ढकलून मी एका सर्विसिंग शॉप मध्ये घेऊन गेले. त्या मेकॅनिकला विचारल्यावर असं कळलं कि ती एअर पाईप आहे. मी त्याला विचारलं कि ती पाईप अशीच निघून पडू शकते का? त्यावर त्यानं सांगितलं कि हि पाईप अशीच पडणे खूप अवघड आहे, कुणीतरी ती उचकटून काढल्याशिवाय ती निघू शकत नाही. आणि आता गाडीला हवेचा सप्लाय नसल्यानं गाडी सुरु होत नव्हती. शेवटी ६० रुपये देऊन मी नवीन पाईप घालून घेतली आणि लाखो रुपयांचा अनुभव पदरात पडून घेऊन ऑफिस ला २ तास उशिरा पोचले.

आजपर्यंत असला कुठलाच अनुभव मला आलेला नाही. हैद्राबाद शहरात फसवणूक करणारी, जाता- येता काहीतरी घाणेरडी comments करणारी माणसं एकूणच खूप कमी असल्यानं आजपण 'आपल्या मदतीला येणारा  माणूस हा genuine आहे' हा माझा विश्वास चुकीचा ठरला. शक्यतो बाई माणसांना गाडीची तितकीशी माहिती नसते. एकाकी रस्त्यावर गाडी बंद पडली तर त्या नक्कीच घाबरून जातात आणि अश्या वेळी समोर मदतीचा हात पुढं करणाऱ्या माणसावर भरवसा ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडं नसतो. ह्या परिस्थितीचा गैरफायदा घेत त्या माणसानं एका क्षणी गाडीची पाईप काढून घेतली आणि ६० रुपयांच्या पाईपचे सहाशे रुपये आणि वरून ती बसवून देण्याचे १००-२०० त्यानं मागितले असते असे ८०० रुपयांचा चुना लावायचा प्रयत्न केला. असं जरी त्यानं दिवसातून ४ गाडयांना केलं तर त्याला किती तरी पैसे मिळतील.



या अनुभवातून शिकलेल्या काही गोष्टी:

१. काहीही होवो कुणालाही आपल्या गाडीला हात लावू देऊ नये.
२. कुणी आपल्याला घाबरवण्यासाठी काही बोललं तर घाबरून जाऊ नये, थंड डोक्यानं त्याचा विचार करावा.
३. काहीही झालं तरी पैसे काढून देऊ नये किंवा आपली गाडी रस्त्यावर एकटी टाकून जाऊ नये.
४. आपण चालवत असलेल्या गाडीची किमान माहिती ठेवावी. सगळ्याच समस्यांचं trouble shooting आपल्याला माहित असणं अपेक्षित नसलं तरीही एक गाडीचालवताना कुठकुठले प्रॉब्लेम्स येऊ शकतात याची माहिती जरूर ठेवावी.
 ५. सांगायला खूप वाईट वाटतं , पण समोरच्या माणसांवर विश्वास ठेवू नये.

एकूणच काय "दुनिया बदल रही है." हेच खरं



Friday, November 23, 2018

क्राईम डायरीज : एक शापित नातं: भाग ९


आयुष्यात आपण खूप चुका करतो... काही लहान सहान, काही खूप मोठ्या तर काही माफी सुद्धा नसणाऱ्या. आपण करतच जातो त्या चुका, कारण काहीही असो.. कधी त्या चुका करणं हि आपलीच चूक असते, कधी परिस्थितीची गरज असते तर कधी जाणून बुजून आपण ते सर्व करतो. चुका कुठल्याही असोत, आयुष्यात झालेली प्रत्येक चूक आपली सावली बनते आणि आपण सरणावर जाईपर्यंत आपला पिच्छा करते...सगळा वेळ, आपल्याही नकळत. आपण एखादी चूक सुधारतो, सुधारण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला वाटतं कि सगळं कसं पूर्वीसारखं ठीक होईल, पण नाही.. केलेल्या चुकांचे फास आपल्याला कधीतरी आवळतातच... कुठंतरी, कुठल्यातरी वळणावर आपल्या समोर उभे ठाकतातच. आपण कुठंच पळू शकत नाही मग. केलेल्या चुकांनी बरबटलेला भूतकाळ आणि त्यांच्या परिणामांमुळं काळवंडलेला भविष्यकाळ यात आपलं आजचं अस्तित्वच हरवून जातं कधी कधी.....
'आज पर्यंत आपण किती तरी वेळा अमित बरोबर मजा करायला गेलो, किती तरी रात्री त्यासोबत घालवल्या. त्या दिवशी मात्र मनापासून पश्चाताप होऊन सगळं तोडून टाकायला गेलो आणि तेव्हाच हे सगळं घडायचं होतं का? नियती इतकी कशी क्रूर असू शकते?. अर्थात आपण गेलो नसतो तरी पण आपण अडकलोच असतो म्हणा. केलेल्या गुन्ह्यांना शिक्षा हि होणारच. त्या दिवशी इन्स्पेक्टर सांगत होते कि ते अमितचा मोबाईल चेक करणार. त्यात आपले आणि अमित चे मेसेजेस आहेत, ते पण अगदी वाचू नयेत असे. बऱ्याचदा रेसॉर्टचं किंवा हॉटेल्सचं बुकिंग आपणच केलंय, ते पण क्रेडिट कार्डने, प्रत्येक हॉटेल मध्ये CCTV असतोच, त्यावरूनही पोलिसांना सगळं कळेल.आपले आणि अमित चे विवाहबाह्य संबंध होते हि गोष्ट इतक्या वाईट प्रकारे बाहेर येईल असं स्वप्नात पण वाटलं नव्हतं. कितीदा तरी हे सगळं अथर्वला कळेल असं वाटायचं आपल्याला पण तेव्हा अमितवर किती विश्वास ठेवायचो आपण, तो सांगायचा 'घाबरू नको शांभवी, असं काही झालं तर मी अथर्वशी बोलेन, त्याला समजावेन आणि हे सगळं सांगूनही त्याला नाही कळलं तर मी तुझ्याशी लग्न करेन.' पण मग परवा रेसोर्ट मध्ये त्यानं आपल्याला असं कसं झिडकारून टाकलं. इतकं मन दुखण्यासारखं बोलत होता अमित, जणू काही त्याच्या आयुष्यात त्याच्या लेखी आपली काहीच किंमत नाही. खरंच काय होता अमित? काहीही असो आपण मूर्ख होतो'
शांभवी टेरेस वर उभी राहून विचार करत होती.
-------------------------------------
दुपारी चार वाजता रिसॉर्टच्या गेस्ट रूम मधल्या खुर्चीवर बसून वर फिरणाऱ्या पंख्याकडं बघत इन्स्पेक्टर पाटील विचार करत होते. डायविंग टीमने जवळपास ४ तास हुडकून देखील त्यांना तलावात काहीच मिळालं नव्हतं. विचार करता करता त्यांना डोळा कधी लागला हे त्यांचं त्यांना कळलं नाही.
"सर, मी आत येऊ का?" दरवाज्यावर नॉक करत सब इन्स्पेक्टर राऊत बोलले.
"या राऊत" इन्स्पेक्टर पाटील थोड्या त्रासिक आवाजातच म्हणाले.
"सर, नाईट शिफ्ट वर त्या रात्री असलेल्या स्टाफशी बोलणं झालं. रात्री १० वाजता अमितच्या रूम मधून खाण्याची ऑर्डर आली होती. ते देण्यासाठी बबन मोरे नावाचा वेटर गेला होता. त्याच्याशी बोलल्यावर कळलं कि अमित आणि ती बाई यांच्यात कसलंतरी भांडण चाललं होत. ती बाई रडत होती. आवाज बाहेरपर्यंत येत होता. अमितनं वेटर ला रूमच्या आत येऊच दिल नाही. त्यानं बाहेरूनच जेवणाचा ट्रे घेतला."
"हम्म.. रात्री अज्ञात व्यक्तीला किंवा अमितला बाहेर पडताना बघितलं का कुणी?"
"नाही. सगळा स्टाफ जवळपास १२च्या दरम्यान रेस्ट रूम मध्ये आराम करायला जातो कारण बारानंतर खूप कमी कस्टमर सर्विस साठी फोन करतात."
"म्हणजे रात्री कॉटेज बाहेर जाताना अमितला कुणीच बघितलं नाही?"
"नाही सर."
"आणि रात्री खोलीत एवढी झटापट होत असतानाही कुणीच काही ऐकलं नाही?"
"सर सगळी कॉटेजेस एकमेकांपासून दूर असल्यानं आवाज ऐकू गेला नसेल." राऊत बोलले.
"असं कसं शक्य आहे राऊत? एवढा शांत परिसर आणि कुणालाच आवाज ऐकू येऊ नये? परत एकदा सगळ्यांना विचार. कुणीतरी नक्कीच खोटं बोलतंय . अमितच्या कॉटेज शेजारची कॉटेज ज्यांनी बुक केली होती त्यांनाही विचारा... आणि हो, आता इशा केतकर बोलण्याच्या अवस्थेत असतील तर त्यांना कळवा कि मी त्यांना भेटायला येतोय. काल रिसॉर्ट मध्ये एन्ट्री केलेल्या प्रत्येक गेस्टची माहिती हवीय मला. जर ही बाई अमितबरोबर आली नाही तर कुठून आली नक्की? बघा एकदा, रिसॉर्ट मध्ये शिरायचा दुसरा कुठला मार्ग आहे का ते."
" ठीक आहे सर ."
"आणि राऊत, काहीतरी पॉसिटीव्ह बातमी सांगा बरं. काहीच कसं काय मिळत नाहीये आपल्याला?"
"सर, केससंदर्भात लीड तरी मिळालीय पण ती कितीशी उपयोगाची आहे ते बघावं लागेल" सब इन्स्पेक्टर राऊत हातातील फाईल टेबलावर ठेवत म्हणाले.
"सर, हे अमित केतकरांच्या मोबाईल चे मागच्या सहा महिन्यांचे डिटेल्स. खून झालेल्या ठिकाणापासूनच त्याचा फोन स्वीच ऑफ झाला आहे तो आत्तापर्यंत कुठंही ऑन झालेला नाही. पण मागच्या सहा महिन्याचे फोन डिटेल्स पहिले तर डोकं भणाणून जाईल. हा अमित केतकर दिसतोय तेवढा साधा माणूस नाही हे नक्की. रात्री अपरात्री बऱ्याच बायकांबरोबर ह्याचं बोलणं होत असलेलं दिसतंय. त्यातल्या बर्याचश्या कॉल गर्ल्स आहेत. मी दोघी चौघीना फोन केला तर कळालं कि त्या सगळ्या एका एस्कॉर्ट एजन्सी मध्ये काम करतात. मग त्या एजन्सी च्या मालकाशी बोललो. अमित केतकर हा त्याचा नेहमीचा कस्टमर. कुठलाही नवीन माल आला तर सगळ्यात पहिल्यांदा तो अमित केतकर कडं जाणार हे जणू काही अलिखित समीकरण होतं. वेगवेगळ्या हॉटेल्स मध्ये, रिसॉर्ट्स मध्ये तर कधी ह्याच्या बिजनेस ट्रिप मध्ये "कंपनी" देण्यासाठी हि एस्कॉर्ट एजन्सी मुली पुरवत असे. ह्या सगळ्याच पेमेंट कॅशनच होत असे."
"हम्म.. म्हणजे हि जी बाईची बॉडी मिळाली आहे ती पण त्यातलीच एखादी असली पाहिजे."
"नाही सर, एजन्सीच्या मालकाप्रमाणं त्या दिवशी मात्र त्याने कुठलीच सर्विस दिली नव्हती अमित केतकरला."
"एखादी कुणीतरी एजन्सीतर्फे न जाता एकटीच जाऊ शकते ना?"
"त्या एजन्सीत काम करणाऱ्या थोड्या मुलींना बोलावलंय बॉडी identify करायला. काही मुली कस्टमर्स बरोबर दोन चार दिवसांच्या आउटिंगला गेल्यात. त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचं काम पण चाललंय. हेड काउन्ट कमी भरला तर तीच "ही"समजायला हरकत नाही."
'पण ह्या सगळ्यात लीड काय आहे राऊत, तुम्ही दिलेल्या माहितीनुसार तर आधीच गुंतागुंतीची असलेली केस अजूनच अवघड झाल्यासारखी वाटतीय."
सब इन्स्पेक्टर राऊत समोरच्या खुर्चीवर बसले आणि त्यांनी हातात असलेली दुसरी फाईल काढून इन्स्पेक्टर पाटलांना दाखवली. त्यासरशी पाटलांच्या चेहऱ्यावर कालपासून प्रथमच हसू आलं.
"मग आपण वाट कसली बघतोय राऊत , गाडी काढा आधी."
---------------------------------------------------------------------------------
"मॅडम तुम्हाला भेटायला इन्स्पेक्टर आलाय." शेवंतानं धावत येऊन सांगितलं तसं शांभवीच्या हृदयात हलकीशी कळ आली आणि हातपाय थरथरू लागले. सगळ्यात आधी एक ग्लास पाणी पिऊन ती थोडा वेळ बेड वर बसली. 'हो, झालीय चूक आपल्या हातून, आणि त्याची शिक्षा भोगू आपण, मग ती काही का असेना. पण आत्ता या क्षणी असं कमकुवत झालो तर आपल्यालाच ह्या सगळ्याचा गुन्हेगार समजून पकडतील. शांभवी, पूर्वार्ध काहीही असो, पण तू खंबीर पणे उभं राहायलाच हवंस.' शांभवी जागेवरून उठली. बाथरूम मध्ये जाऊन तिनं खसखसून तोंड धुतलं, समोरच्या आरश्यात केस ठीक केले आणि जिन्यावरून खाली हॉल मध्ये आली. सोफ्यावर इन्स्पेक्टर पाटील आणि अजून कुणी एक पोलीस इन्स्पेक्टर बसला होता.
"या मिसेस शांभवी सरपोतदार, एकाच दिवसात परत एकदा तुम्हाला भेटायला मिळेल असं वाटलं नव्हतं."
"काय झालं इन्स्पेक्टर?" शांभवी उसनं अवसान आणत म्हणाली.
"आता आम्ही काय सांगायचं मिसेस सरपोतदार. सगळी शिदोरी तर तुमचाकडंच आहे. तीच उघडायला मदत व्हावी म्हणून आम्ही आलोय इकडं"
"म्हणजे?"
"हे बघा, काही न कळल्याचं नाटक करू नका. चुपचाप सांगा, तुमच्यात आणि अमित मध्ये नक्की काय नातं होतं?"
"मागच्या वेळी सांगितलं ना तुम्हाला, की तो आणि मी चांगले मित्र होतो, मी आणि तो एका प्रोजेक्ट वर काम करत होतो. ह्या पलीकडे माझा आणि अमितचा काहीच संबंध नाही"
"असं असेल तर मग तुम्ही काय फावल्या वेळेत एस्कॉर्ट एजेन्सी मध्ये कॉल गर्ल म्हणून काम करायचा का?" इन्स्पेक्टर पाटलांनी दरडावून विचारले.
क्षणभर काहीच न कळल्याने शांभवीच्या तोंडातून शब्द फुटेना.
"काहीही तोंडाला येईल ते बोलू नका इन्स्पेक्टर." शांभवी सगळी शक्ती एकवटून बोलली.
"तोंडाला येईल ते? तुमचे आणि अमितचे अविरत चालणारे कॉल्स, मेसेजेस, आणि बऱ्याचदा रात्री अपरात्री दोघांचे एकाच ठिकाणी असणारे फोन लोकेशन्स काहीतरी वेगळच सांगतायत. बऱ्याचदा अमितच्या फोन चं लोकेशन तुमच्या घरात दिसतंय ते पण अख्खी रात्र, कधी तुमच्या दोघांचं लोकेशन कुठल्यातरी रिसॉर्ट मध्ये दिसतंय तर कधी चार चार दिवस-रात्र एकत्र दिसतंय. संबंध नसताना त्याच्या बरोबर रात्र घालवत असाल तर मग मी म्हणतो तसं एस्कॉर्ट एजेन्सी मध्ये कॉल गर्लच असणार तुम्ही."
आता मात्र शांभवीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं.
"हि नाटकं पुरे झाली आता मिसेस सरपोतदार, पटपट बोला काय ते."
आता काहीच लपवून उपयोग नाही ह्याची पुरेपूर जाणीव शांभवीला झाली.
"माझ्या आणि अमित मध्ये मैत्रीपलीकडं पण एक नातं होतं . आमचं एकमेकांवर प्रेम होत. तुम्ही आत्ताच सांगितलं तसं मी आणि अमित बऱ्याचदा एकत्र असायचो, तुम्हाला म्हणायचंय तसे आमच्यात शारीरिक संबंधही होते. हि गोष्ट अर्थातच कुणालाच माहित नाही आणि तुम्ही पण हि गोष्ट कुणालाही सांगू नये अशी माझी विनंती आहे."
"सांगायचं कि नाही ते आमचं आम्ही बघतो. तुम्ही आम्हाला ते शिकवायची गरज नाही" सबइन्स्पेक्टर राऊत चिडून बोलले
"मी तुम्हाला फक्त विनंती करतीय कारण माझ्या चुकीमुळं माझं कुटुंब मोडू नये असं मला वाटतं. आणि हे सगळं मला आज अचानक अमित गेलाय म्हणून वाटत नाहीये तर मी केलेल्या चुकीचा मला पश्चात्ताप झाला होता आणि म्हणूनच त्या दिवशी सकाळी मी रिसॉर्ट मध्ये हे सगळं संपवायलाच गेले होते."
"आणि तुम्ही ठरवल्याप्रमाणे अमितला संपवला."
"काय बोलताय तुम्ही इन्स्पेक्टर? त्या दिवशी सांगितल्याप्रमाणं मी फक्त त्याच्याशी बोलून निघून आले होते"
"खोटं बोलताय तुम्ही मिसेस सरपोतदार, कारण खुनाच्या रात्री तुमच्या फोनचं लोकेशन त्या रिसॉर्ट मध्येच होतं, ते पण रात्री २.३० ते ४ च्या दरम्यान."
--------------------------------------------
"हॅलो डॉ शहा, कसा चाललाय तपास?" घरी पोचल्यावर रात्री इन्स्पेक्टर पाटलांनी डॉ शहांना फोन लावला.
"आमचं काम मृतदेहांबरोबर, जन्माला आल्यापासनं विश्वास ठेवण्याजोगा माणसाचा एकच अवतार आणि तो म्हणजे त्याचा मृतदेह. डेड बॉडीज खोटं बोलत नाहीत इन्स्पेक्टर."
"मग काय खरं सांगितलं तुम्हाला त्या मृतदेहांनी?"
"हम्म.. आपण अमित केतकरपासून सुरु करूयात. खून रात्री तीन ते चारच्या दरम्यान झालाय. . खून करताना वापरलेला चाकू हा किचन मध्ये वापरायचा चाकू आहे, आणि तो पण अगदी नवीन. चाकूवर कुठलेही ठसे मिळाले नाहीत. पाठीमागनं येऊन अचानक पाठीत वार केल्यानं झटापटीला किंवा प्रतिकार करायला वेळच मिळाला नाही. चाकूचा वार इतका खोल आहे कि केतकरला लगेचच मूर्च्छा आली असावी. खूप रक्तस्त्राव झाल्यानं मृत्यू झालाय. आणखी एक सांगायचं झालं तर खून कुणी अश्या व्यक्तीनं केलाय ज्याची उंची अमितपेक्षा कमी आहे कारण वार खालून वर झालेत. खुनी उजव्या हाताचा वापर करणारा आहे."
"आणि जे आपल्याला बुटांचे ठसे मिळाले त्याबद्दल काय?"
तलावाकाठची माती ओली असल्यानं बुटांचे ठसे अगदी स्पष्ट आहेत. काही ठसे अमितच्या चपलांचे आहेत तर दुसरे आठ नंबरच्या बुटांचे?"
"म्हणजे पुरुषाचे?" इन्स्पेक्टर पाटलांनी आश्चर्यानं विचारलं.
"हो, पुरुषाचेच. आणि त्या व्यक्तीच वजन अगदी योग्य प्रमाणात असले पाहिजे, म्हणजे ना जास्त जाड, ना सडपातळ कारण ठसे खूप खोल नाहीत किंवा अगदी उथळ पण नाहीत. खुनी तलावापर्यंत कसा आला हे समजणं थोडं अवघड आहे कारण तलावाशेजारी खूप गवत आहे आणि त्यावर पायांचे ठसे मिळणं मुश्किल आहे, तसेच बऱ्याच गाडीच्या चाकांचे मार्क्स हि मिळालेत. त्यामुळं त्याबद्दल मी निश्चितपणे सांगू शकणार नाही."
"काही हरकत नाही डॉक्टर, इतकी माहिती पुरेशी आहे. आणि त्या बाई बद्दल?
"अमितप्रमाणेच तिचाही खून किचन मध्ये वापरल्या जाणाऱ्या चाकूनेंच जवळपास त्याच वेळी केला गेलेला आहे. चाकूवर कुठलेच ठसे नाहीत. तसेच खोलीत इतरत्र ही संशय यावेत असे ठसे मिळालेले नाहीत. मेलेली बाई जवळपास २५ वर्षाची असावी. तिचा चेहरा बिघडवण्यासाठी वापरलेली वस्तू मात्र कुठल्यातरी दगडाची असावी कारण बाथरूम मध्ये अगदी बारीक दगडाचा भुगा मिळालाय. खोलीत दोन चार ठिकाणी समुद्राची वाळू पण मिळाली आहे. ह्या बाईचा मृत्यू मात्र डोक्यात झालेल्या वारामुळं झालाय."
"ती बाई सेक्स वर्कर असावी असं वाटतंय का तुम्हाला?"
"इन्स्पेक्टर, एखाद्या डेड बॉडी वरून बाईचा व्यवसाय हुडकून तसं अवघड असतो. कधी कधी आम्हाला मृतदेहाच्या अंगावर जुने व्रण सापडतात, कधी सिगारेट चे चटके तर कधी हाणामारीचे व्रण तर कधी एखादी बाई तसल्या रोगांनी ग्रस्त असते. ह्या आणि असल्या बऱ्याच गोष्टींमुळं आम्ही आडाखे बांधतो कि कदाचित ती बाई वेश्या देखील असू शकेल. ह्या बाईच्या अंगावर आम्हाला असले काहीच सापडले नाही पण ह्याचा अर्थ ती प्रॉस्टिट्यूट नाही असाही होऊ शकत नाही."
"हम्म... I can understand. दोन्ही खुनांमध्ये आणखी काही साम्यता आहे का?"
"खुनी एकच असण्याची शक्यता आहे. चाकूचा वार करण्याची पद्धत एकसारखी आहे. अमित आणि त्या बाईच्या पोटात न पचलेलं अन्न मिळालं आहे. दोघांच्यामध्ये आदल्या दिवसात आणि खुनाच्या रात्रीला शरीर संबंध झालेले आहेत. परंतु कुठल्याही पद्धतीची जबरदस्ती झालेली नाही."
"डॉक्टर ह्या सगळ्यावरून तुम्हाला काय वाटतं ? खुनी एखादी स्त्री असावी का पुरुष? कारण आम्हाला एका स्त्री वर संशय आहे."
"वेल, खुनी एक स्त्री असण्याची शक्यता बरीच कमी आहे. कारण ज्या प्रकारचे चाकूचे वर केले गेले आहेत, ते करायला एका बाईची शक्ती नक्कीच कमी पडेल. तसेच एखादी अवजड वस्तू उचलून तिथं पर्यंत आणणे, ती उचलून त्यानं एखाद्याच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा करणे आणि ती वस्तू धुवून, पुसून परत घेऊन जाणे हे एका स्त्री ला अशक्य नसलं तरी बरंच अवघड आहे. आणि परत खुनाच्या जागी पुरुषाच्या बुटांचे ठसे मिळालेत हे विसरूनही चालणार नाही."
थोडा वेळ विचार करून इन्स्पेक्टर मम्हणाले, "डॉक्टर, मी तुम्हाला वाळूची काही सॅम्पल्स पाठवतो, तुम्हाला खोलीत मिळालेल्या वाळूच्या बरोबर ती एकदा मॅच करा. आणखी एक, मिसेस शांभवी सरपोतदार, जी आमच्यासाठी प्राथमिक संशयित आहे तिच्या बोटांचे ठसेही एकदा तुम्हाला स्पॉट वर मिळाल्या ठश्यांशी मॅच करून बघावेत हि विनंती आहे. आणखी काही मिळालं तर नक्की फोन करा, मी वाट पाहीन."
"नक्कीच." असं म्हणून डॉ शहांनी फोन ठेवू दिला
फक्त फोन खुनाच्या जागी मिळणं हा सबळ पुरावा असू शकत नाही. खून सिद्ध करायला संशयित खुनाच्या जागी हजर होता किंवा त्याचा त्यात सहभाग होता हे सिद्ध करणे तितकेच महत्वाचे असते. शांभवीचा फोन रिसॉर्ट मध्ये असला तरी तिने हा खून केलाय हे सिद्ध होण्याजोगे अजूनही काहीच मिळत नव्हते.
इंस्पक्टर पाटलांनी घराच्या बाल्कनीतून बाहेर बघितलं तेव्हा सगळं जग आपापल्या घरात शांत झोपलं होतं... कदाचित खुनी सुद्धा.
एक दिवस संशयाचं जाळं विणत रात्रीच्या कुशीत सामावला होता.