Monday, November 19, 2018

क्राईम डायरीज : एक शापित नातं : भाग ८


अत्यंत सफाईदार वळणे घेत इन्स्पेक्टर पाटलांची पोलीस व्हॅन 'ग्रीन वाइल्ड रेसोर्ट' मध्ये शिरली तेव्हा इन्स्पेक्टर पाटील सकाळपासून घडलेल्या घटना आठवत होते. आज सकाळी सहा वाजता जेव्हा इन्स्पेक्टरांना फोन आला तेव्हा ते मॉर्निंग वॉक करून नुकतेच घरी पोचलेले होते. रिसॉर्ट मध्ये खुनाची केस हि फार गंभीर बाब होती. एक तर ग्रीन वाईल्ड हे फार मोठं आणि नावाजलेलं रिसॉर्ट होतं आणि दुसरं म्हणजे खुनाच्या बातमीनं रिसॉर्ट मध्ये वास्तव्यास असलेल्या इतर लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होण्याची दाट शक्यता होती. सकाळच्या नाश्त्यासाठी पण थांबता पाटील सगळ्यात आधी खून झालेल्या स्थळी पोहोचले. रिसॉर्ट च्या आवारातच असलेल्या एका तलावाच्या शेजारी बरीच गर्दी जमली होती. तलावाच्या काठावरच पोटावर पडलेला मृतदेह पाटीलांनी पहिला आणि टीम ला 'चॉक आउटलाईन' काढायला सांगून ते स्वतः आजूबाजूचा परिसर धुंडाळू लागले. ओल्या मातीत दिसणाऱ्या बुटांच्या खुणांनी त्यांचं लक्ष वाढवून घेतलंलागलीच एका कॉन्स्टेबल ला जवळ बोलावून त्यांनी त्याच्या कानात काही ठराविक खुणा मार्क करण्याच्या सूचना दिल्या आणि ते परत एकदा मृतदेहाजवळ पोचले.
"काही ओळख पटली आहे का बॉडीची?" त्यांनी कॉन्स्टेबल साळुंखे ला विचारले. ५० वर्षांचे साळुंखे कुठल्याही खुनाच्या केस मध्ये इंस्पक्टरांसोबत असायचे. त्या दोघांमध्ये कुठल्याही केस बाबत कसलीही प्रदीर्घ चर्चा होत असताना डिपार्टमेंटच्या कुणी कधीच बघितलं नसलं तरी इन्स्पेक्टर पाटलांना नक्की काय हवंय हे साळुंखेना व्यवस्थित माहित असायचं.
"साहेब, बॉडी पूर्ण तपासली आहे. पाकीट, मोबाईल असं काहीच मिळालेलं नाही. गळ्यात तोळ्यांची चेनहातात सोन्याचं ब्रेसलेट आणि बोटांत सोन्याच्या अंगठ्या आहेत. कपड्यावरून आणि पायात घातलेल्या चपलांवरून बॉडी कुण्या श्रीमंत माणसांची आहे असं वाटतं."
इन्स्पेक्टर पाटलांना साळुंखे बद्दल हेच आवडायचं. हलकेच हसत त्यांनी जवळच उभ्या असलेल्या रिसॉर्टच्या मॅनेजरला जवळ बोलावलं आणि सांगितलं,
"रिसॉर्ट मधल्या एकूण एक खोल्या उघडून बघा. तुमच्या रजिस्टर मध्ये आत्ता ह्या रिसॉर्ट मध्ये वास्तव्यास असलेल्या एकूण एक कस्टमर्सना शोधून काढा."
"पण सर, सकाळची वेळ आहे, एवढ्या लवकर सगळ्यांना डिस्टर्ब करायचं म्हणजे...."
"खुनाची केस आहे, तेव्हा मला असली फालतू कारणं नकोयत. जर लोक दरवाजा उघडत नसतील तर सरळ मास्टर कि ने दरवाजे उघडा आणि मलाअर्ध्या तासाच्या आत कळवा. कुणालाही मी सांगितल्याशिवाय चेक आऊट करू द्यायचा नाही की रिसॉर्टच्या स्टाफ ने रिसॉर्ट बाहेर जायचं नाही. नाईट शिफ्ट चा स्टाफ इथंच आहे की निघून गेलाय?"
"सर, नाईट शिफ्ट चा स्टाफ सकाळी सहाला निघून जातो. सगळा स्टाफ इथून जवळच असलेल्या क्वार्टर मध्येच राहतो."
"मग बोलवून घ्या सगळ्यांना पटपट. सब इन्स्पेक्टर ऊत, तुम्ही आणखी दोन कॉन्स्टेबलनं घेऊन जावा यांच्यासोबत. जर कुणी गायब असेल किंवा कुणी काही संशयास्पद असं काही पाहिलं ऐकलं असेल तर मला लगेच सांगा"
राऊत मॅनेजर बरोबर निघून गेल्यावर इन्स्पेक्टर पाटील पुन्हा डेड  बॉडी जवळ गेले. पाठीत सुरा खुपसून खून केलेला दिसत होताइन्स्पेक्टर पाटीलांनी थोडं वाकून ओघळलेल्या रक्ताला हात लावून बघितलं तर अजूनही रक्त ताजं होत.
"साळुंखे खून होऊन - तासच झाले असतील. कुठेही झटापटीच्या खुणा नाहीयेत, शेजारच्या गवता आणि माती वर फरफटलेल्या खुणा नाही आहेत त्यामुळं खून इथंच झालाय असं वाटतंचिखलात दोन चार ठिकाणी बुटांचे ठसे दिसले मला मगाशी, त्यांना मार्क करून ठेवलंय. मृतदेहाच्या चेहऱ्यावर मात्र घाबरलेले भाव आहेत, जणू काही खून अगदी कुणीतरी जवळच्या आणि विश्वासू माणसानं अनपेक्षितपणे केलाय. मयताच्या अंगाला clive christian perfume चा सुगंध येतोय, तुम्ही मगाशीच म्हटल्याप्रमाणं पायात महागडे चप्पल आहेतआणि हातात rolex घड्याळ आहे. मयत हा कुणीतरी श्रीमंत माणूस दिसतोय."
"हो साहेब, पण जवळ कुठलाच फोन किंवा पाकीट दिसलं नाही. दुसरं म्हणजे एवढ्या रात्री हा मनुष्य इकडं तलावावर यायचं काय कारण असू शकेल?"
"ते तर आपल्याला ह्याचं नाव आणि बॅकग्राऊंड समजल्यावरच कळेल. साळुंखे, तुम्ही एक काम करा, आपल्या डायविंग टीम ला बोलावून एकदा तलावाची संपूर्ण तपासणी करून घ्या. फोरेन्सिक टीम थोड्या वेळेत पोहोचेलच. तुम्ही इथंच त्यांच्याबरोबर थांबा आणि वेळोवेळी मला रिपोर्ट करा. एक पण पुरावा सुटला नाही पाहिजे. मी तोवर रिसॉर्ट मध्ये जाऊन येतो."
रिसॉर्ट मध्ये पोचल्यावर सगळ्यात आधी ते मॅनेजर जवळ गेले. खुनाची बातमी जवळपास सगळ्याच कस्टमर्स ना कळल्याने सगळेच जण घोळक्यांमध्ये थांबून चर्चा करत होते. इन्स्पेक्टर पाटलांना दुरूनच पाहून मॅनेजर जवळपास पळतच त्यांच्याजवळ आला. तो अतिशय घाबरलेला दिसत होता.
"काय झालं? असा भूत बघितल्यासारखा का चेहरा केलाय?"
"चला साहेब मी तुम्हाला  काहीतरी दाखवतो म्हणजे तुम्हाला पण कळेल काय झालंय ते."
मॅनेजर च्या बरोबर इन्स्पेक्टर जेव्हा कॉटेज नंबर ३०६ मध्ये पोहोचले तेव्हा समोरचे दृश्य बघून त्यांचा चेहरा पण पांढरा फटक पडला. थोडं पुढं जाऊन त्यांनी रूम मध्ये आजूबाजूला बघितलं तर संपूर्ण रूम मध्ये उलथापालथ केलेली होती. चादर, उश्या, नाईट लॅम्प.. सगळंच इकडं तिकडं पसरून पडलेलं होतं. रूम च्या मधोमध जणू रक्ताचा सडा पडला होता आणि या सगळ्या मध्ये एका स्त्रीचा मृतदेह पडलेला होता. बॉडी ची हालत बघवत नव्हती. पोटात सुरा खुपसलेला होता आणि संपूर्ण चेहरा कोणत्यातरी अवजड वस्तूने अक्षरशः चिरडलेला होता. झटापटीची लक्षणं पण दिसत होती आणि कदाचित त्यामुळेच बाईच्या अंगावरचे कपडे ठिकठिकाणी फाटलेले होते. एकूणच त्या रूम मधले दृश्य अंगावर काटे आणणारे होते.
"राऊत, कॉटेज  कुणाच्या नावावर बुक आहे?"
"साहेब, अमित केतकर ह्या नावं कॉटेज बुक आहे, त्यांच्या नि त्यांच्या पत्नीसाठी."
"चेक इन करताना दिलेले photo ID proof घेऊन या बरं ."
"हो सर, आलोच घेऊन"
थोड्याच वेळात राऊत photo ID proof घेऊन आले आणि त्यांनी ते इन्स्पेक्टरच्या हातात दिलं .
"ह्म्म्म... अमीत केतकर, हा तर तोच मनुष्य आहे ज्याचा मृतदेह तलावाशेजारी सापडलाय. एकदा बघा बरं कालच्या दिवसात ह्यांना भेटायला कोण कोण आलं होत?"
"सर, रजिस्टर चेक केलंय मी. कुणीतरी शांभवी सरपोतदार नावाच्या बाईची एन्ट्री दिसते आहे रजिस्टर वर. गाडीचा नंबर पण आहे. मी CCTV मध्ये बघितलं तर रजिस्टर मध्ये लिहिल्याप्रमाणे अकराच्या सुमारास लिहिलेल्या नंबरच्या गाडीतून ह्या बाई आल्या होत्या. जवळपास अर्ध्या तासाने CCTV मध्ये गाडी परत गेलेली दिसतेय पण रजिस्टर मध्ये नोंद नाही."
"का?"
"नाही म्हणजे साहेब, कधी कधी सिक्युरिटी गार्ड एन्ट्री करायचं विसरतो. आलेली माणसं पण बऱ्याचदा जायच्या वेळी गेट वर थांबून एन्ट्री करत नाहीत, ती तशीच सुसाट गाडीतून निघून जातात. त्यामुळं सिक्युरिटीला कोण निघून गेलं हे बऱ्याचदा काळात नाही. त्यामुळंच  कदाचित रेजिस्टर मध्ये एन्ट्री नसेल." मॅनेजर अडखळत म्हणाला.
"एवढं मोठं रिसॉर्ट असूनही असला कारभार? म्हणजे उद्या जर तुमचा CCTV बंद पडला तर कोण कधी बाहेर पडलं हे कळणारच नाही तुम्हाला, होय ना?"
"सॉरी सर. आम्ही यापुढं काळजी घेऊ."
"राऊत, या बाईंच्या नंतर इतर कुणी आलं होत का अमित केतकरांना भेटायला?"
नाही सर, रजिस्टर मध्ये तशी काहीच नोंद नाही."
"बर ठीक आहे, गाडीच्या रेजिस्ट्रेशन वरून ह्या बाईंच्या घरचा पत्ता शोधून काढा. आणि हि रूम पण सील करा, साळुंखेंना पण या सगळ्याची माहिती द्या. तिकडचं काम झाल्यावर फोरेन्सिक टीम ला इकडं बोलवून घ्या. अमित केतकरांच्या घरी फोन करून शक्य ती सगळी माहिती काढा, त्यांच्या घरी एक कॉन्स्टेबल पाठवून ह्या सगळ्याची माहिती द्या आणि कुणाला तरी बोलवून घ्या लगोलगहे सगळं होईपर्यंत दुपारचे दोन तरी वाजतील. तो पर्यंत मी ह्या शांभवी सरपोतदाराना भेटून येतो."
----------------------------------------------
ग्रीन वाईल्ड रिसॉर्ट च्या पार्किंग मध्ये आपली गाडी थांबवून इन्स्पेक्टर पाटील सर्वात आधी रेस्टॉरंट कडं वळले. सकाळपासून पोटात काहीच नसल्यानं त्यांना जाम भूक लागली होती. सकाळी टीम ला काम वाटून दिल्यानं अजून थोडा वेळ तरी काही करण्यासारखं नव्हतं. व्यवस्थित खाऊन घेतल्यावर ते कॉटेज नंबर ३०६ मध्ये पोहोचले तेव्हा दोन्ही बॉडीज पोस्ट मॉर्टम साठी पाठवून दिल्या होत्या. रूम मध्ये असलेले बोटांचे ठसे हुडकण्यासाठी पावडरींग करण्यात व्यस्त असलेल्या डॉक्टर शहा ह्यांना इन्स्पेक्टरनी विचारलं,
"काही प्रगती डॉक्टर शहा? काही लीड मिळतेय का?"
"ओह्ह हॅलो इन्स्पेक्टर पाटील" आपल्या हातातील पावडरचा डबा असिस्टंट कडं देऊन आणि ग्लोव्हस काढून डॉक्टर शहांनी हस्तांदोलन केलं. "बाहेर बसुयात का थोडा वेळ?"
कॉटेजबाहेर असलेल्या बांबूच्या खुर्च्यांमध्ये दोघेजण बसले.
"हां, तर मी विचारात होतो काही धागा मिळालाय का?" इन्स्पेक्टर पाटलांनी विचारलं.
"तुम्हाला तर माहित आहेच कि इतक्या लवकर काही सांगणे अवघड आहे. खोलीत बरेच ठसे मिळालेत पण त्याची पडताळणी करण्यात तसेच पोस्ट मॉर्टम करण्यात दोन दिवसांचा कालावधी तर लागेलच. थोड्या गोष्टी मला खूप खटकतायत. एक म्हणजे खोलीत असलेल्या बाईचा चेहरा संपूर्ण बिघडवून टाकून तिची आयडेंटिटी पुसून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. खुनी मुख्यत्वे हे अशासाठी करतात कि जेणेकरून नक्की खून कुणाचा झालाय हे कळू नये पण हा प्रयत्न अमितच्या बाबतीत झलेला नाही. असं करण्याचं एक कारण असं असू शकेल कि जरी अमितचा चेहरा बिघडला असता तरी मयत हा अमितच आहे हे समजायला आपल्याला जास्त वेळ लागला नसता कारण त्याचा खून हा तो रहात असलेल्या रेसोर्ट मध्येच केला गेलाय आणि त्यामुळंच खुन्याने त्याची आयडेंटिटी लपवण्यात अजिबात वेळ घालवला नाही पण उलटपक्षी ह्या बाईची आयडेंटिटी मात्र संपूर्ण पणे लपवली आहे. असं करून खुन्याला नक्की काय साध्य करायचं आहे हे मला कळलेलं नाही."
"हम्म.. तुम्ही म्हणताय ती विचार करण्यासारखी बाब आहे."
"दुसरी गोष्ट अशी कि खोलीत अमितचं किंवा ह्या बाईचा मोबाईल किंवा पाकीट काहीच सापडलेलं नाहीये. डस्ट बिन मध्ये वापरलेले दोन कंडोम मिळालेत. ज्या वस्तूनं बाईचा चेहरा बिघडवला गेलाय ती वस्तू पण गायब आहे. पण जाण्याआधी बाथरूम मध्ये ती वस्तू व्यवस्थित धुतली गेली आहे, बाथरूम मध्ये असलेल्या टॉवेलने ती पुसली गेली आहे. खून पहाटेच्या वेळी झालाय आता तो एकाच व्यक्तीनं केलाय कि ह्यात दोन किंवा दोनपेक्षा जास्त माणसं सहभागी आहेत हे आपल्याला दोन दिवसात कळेलच. "
"ठीक आहे डॉ. शहा. थँक्स."
नंतर इन्स्पेक्टर पाटील रिसॉर्ट मॅनेजर कडं पोहोचले. तिथं त्याच्याकडं बयाच जणांची गर्दी होती. विचारणा केली असता बरेच कॅस्टमर्स चेक आऊट साठी खोळंबलेले दिसत होते.
 "राऊत, काही संशय घेण्यासारखे मिळाले का?"
"सर सगळ्या खोल्यांची झडती घेतलीय, ह्या सगळ्यांची ओळखपत्रं पण तपासलीत. काही संशय घेण्याजोगं नाही मिळालं."
"ठीक आहे, घरचे पत्ते, फोन नंबर घ्या सगळ्यांचे आणि जाऊ द्या सगळ्यांना, पण कुणालाही शहराबाहेर जायचं असेल तर आधी परवानगी घ्यावी लागेल असं बजावा. आणि हो, ह्या अमित केतकरांचा मोबाइल नंबर surveillance वर टाका. सगळी मोबाइल हिस्टरी शोधून काढा. कुणाला फोन करत होता, कधी फोन करत होता, social मीडिया, बिझिनेस आणि पर्सनल rivals ..... सगळं सगळं हवंय मला ."
"येस्स सर."
"आणखी एक, त्या शांभवी सरपोतदारांचे मोबाइल डिटेल्स काढा जरा. ती बाई दिसते तशी साधी नाही नक्कीच. "
सकाळपासनं एवढं सगळं करून काही पुरावा हाती लागल्यानं इन्स्पेक्टर पाटील आता चिडले होते. कुठलाच मर्डर हा परफेक्ट मर्डर नसतोच पण तरीही त्यातलं इम्परफेक्शन जेवढ्या लवकर सापडेल तेवढा जास्त आनंद पोलिसांना होत असतो. विचार करत असतानाच कॉन्स्टेबल साळुंखे इन्स्पेक्टर पाटलांजवळ आले.
"सर, अमित केतकरांच्या मिसेस, इशा केतकराना घेऊन आलोय. त्या घरी नसल्यानं त्यांना त्यांच्या माहेरी जाऊन घेऊन यावं लागलं. ऑफिस मध्ये बसवून ठेवलंय त्यांना. तुम्ही एकदा येऊन भेटलात तर...."
"तू जा पुढं, येतोच मी दहा मिनिटात."
सकाळपासनं खोलीत असलेली बॉडी मिसेस अमित केतकरांची असेल हि इंस्पेक्टरांची पन्नास टक्के आशा देखील आता मावळली होती आणि समोर दिसणारी खुनाची केस आता 'ब्लाइंड मर्डर केस' झाली होती.

No comments: