गावाबाहेरच्या एका गचाळ भागात एक तितकीच गचाळ वस्ती होती, अगदी रेल्वे लाईनच्या बाजूलाच. रेल्वेमधून लोकांनी फेकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि कागद वस्तीच्या सभोवताली पसरलेले असत. या सगळ्या मधूनच नेहमी तुंबल्यानं पूर आल्यासारखं एक गटार पण वाहायचं. त्याचशेजारी वस्तीतली काही मुलं उकीडवी बसलेली असत तर बाकीची आजूबाजूच्या उकिरड्यात खेळत बसलेली असत. ह्या घाणेरड्या खोपटांच्या गर्दीतच अगदी शेवटी बाबू आणि लक्ष्मीचं एक खोपटं होतं.
बाबू आणि लक्ष्मीचं लग्न होऊन जवळपास १० वर्ष झाली होती. लग्नानंतर पहिल्या वर्षाच्या आतच सुमनचा जन्म झाला. जन्मतःच बाबूचा उजवा पाय डाव्या पायांपेक्षा थोडा आखूड असल्यानं तो नेहमी दुडक्या चालीनं चाले आणि त्यामुळंच शारीरिक श्रमाची काम तो करू शकत नसे. लग्नानंतर ह्या खोपटात राहायला आल्यावर आधीची काही वर्षं बाबू जवळच्याच एका बांधकामाच्या जागी गवंड्याचं काम करायचा. इमारत बरीच मोठी असल्यानं जवळपास ८ वर्षं तिचं बांधकाम चालू होतं आणि त्यामुळं नाही म्हटलं तरी त्यांच्या तोडक्यामोडक्या संसाराला आर्थिक टेकू मिळालेला होता. परंतु जसं बांधकाम संपलं तसं मात्र पैश्याची चणचण भासू लागली. पदरात एक पोर आणि दारिद्र्य ह्यामध्ये कुटुंब होरपळून जाऊ लागलं. बऱ्याचदा घरात अन्नाचा एक कण नसे. दररोज कामगार भरती साठी मुकादम वस्तीत यायचा पण बाबूच्या पायाच्या उणेपणामुळं त्याला काम मिळायचं नाही. एखाद्या दिवशी कामगार कमी पडले तर तो बाबूला कामासाठी घेऊन जायचा पण दिवसभर राबल्यानंतरपण फक्त निम्मा मोबदला त्याच्या हाती टेकवायचा. आता एवढयाश्या पैश्यात संसार चालायचं दूरच पण दोन वेळची भाकरी सुद्धा मिळायची नाही. पोरीला शाळेत सोडायचं स्वप्न जाऊ दे, तिला रात्री जेवायला मिळायचं पण अवघड झालेलं होतं.
अशाच एका दिवशी दुपारच्या वेळी रस्त्याकडेच्या दगडावर लक्ष्मी डोक्याला हात लावून बसलेली होती. समोर ९ वर्षांची सुमी एकटीच खेळत बसलेली. खरं तर खेळत कसली, प्रवाश्यांनी टाकलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांत काहीतरी हुडकत होती आणि डोळ्याच्या कोपऱ्यातून हळूच लक्ष्मीला बघत होती. लक्ष्मीला कळत होतं की पोरीचं नक्की काय चाललंय, पण ती देखील बघून न बघितल्यासारखं करत होती. पोटात दोन दिवसांपासून काही नसलेलं लेकरू करणार तरी काय?
इंजिनच्या आवाजानं तिच्या विचारात खंड पडला आणि समोर बघितलं तर एक ट्रेन क्रोसिंग साठी थांबली होती. वस्तीपासून जवळपास २ किलोमीटरवर पुढचं जंक्शन होतं आणि त्याआधी ह्या वस्तीच्या थोडंसं पुढंच एक रेल्वे क्रॉसिंग होतं. त्यामुळं बऱ्याचश्या गाड्या वस्तीपाशी एक तर थांबायच्या, नाही तर त्यांचा वेग तरी कमी व्हायचा. ट्रेनकडं टक लावून बघत असताना अचानक लक्ष्मीच्या डोक्यात एक कल्पना आली.
संध्याकाळी बाबू घरी आल्यावर त्याचा पडलेला चेहरा बघूनच कळत होतं की आज पण काहीच काम मिळालेलं नाहीये. परत येताना, एका चौकात उठून गेलेल्या बाजारानंतर खाली मातीत पडलेले काही टोमॅटो त्यानं आणलेले होते. लक्ष्मीनं त्यातले बरेचसे कुजके टोमॅटो बाजूला काढून बाकीचे बाबू आणि सुमीला मिठाबरोबर खायला दिले आणि ती स्वतः तांब्याभर पाणी पिऊन गोधडीवर पहुडली.
"अवं , म्या काय म्हनते?"
"हं बोल, आता तूच राह्यल्यास बोलाची"
"अवं आसं काहून म्हनता? मला का कळत न्हाई का की तुमी भायर जाऊन रोज काम हुडकतायसा."
"आगं, पन काम मिळत न्हाय त्याचं काय?"
"आवं, म्हनूनच म्हंत्ये, वाईच माझं आयका तरी..."
"काय ते?"
"आव रोज हितंच आपल्या खोपटाम्होरं धा बारा तरी रेल्वे गाड्या थांबत्यात. म्या काय म्हंते, आपन रोज गाडीमंदी फिरून 'च्या' आनि 'बटाटेवडं' इकलं तर? आवं , हितनं पुढच्या टेसनात उतरून परत हिकडं याचं. एका दिसात 'ईस' येळा फेऱ्या घातल्या तरी रोजच्या भाकरीचं आनं सुमीला शाळंत धाडन्याइतकं पैकं येतीलच नव्हं?"
"आगं, पन ह्ये समदं इकायचं म्हंजे सामान नको का? भांडी, 'च्या' न्यासाठी पिंप, पेले... काय काय लागतंय तुला म्हाईत तर हाय का?"
"म्या बी इचार केला याचा, माझ्या डोरल्यातल्या वाट्या इका, पैकं कमी पडलं तर त्या मुकादमाला इचारा थोडं, आपन काय त्याचं पैकं बुडवून जानार न्ह्याय नव्हं?"
खरं सांगायचं तर बाबूला लक्ष्मीनं सांगितलेली कल्पना एकदम आवडली होती. पुढल्या स्टेशनच्या अगोदर मागं जवळपास दोन तासापर्यंत कुठलंच मोठं स्टेशन नसल्यानं चहा आणि वडे नक्कीच विकले गेले असते. धंदा बुडत्यात जाणारा तर नक्कीच नव्हता आणि परत स्वतःचा धंदा असल्यानं रोज उठून कुणाकडं हात पसरायची गरज नव्हती. दुसऱ्याच दिवशी बाबूनं सोनाराकडं जाऊन मंगळसूत्रातल्या वाट्या आणि मणी विकले. कमी पडलेले पाचशे रुपये त्यानं मुकादमाच्या हातापाया पडून मिळवले. बाबूच्या खोपटात त्या दिवसानंतर मात्र रोज उशिरापर्यंत चिमणी जळायला लागली. सामान कुठनं आणायचं, किती आणायचं, किती ट्रेन येतात, कधी थांबतात ह्यावर वारेमाप चर्चा होऊ लागल्या. आठवड्याच्या बाजारादिवशी संध्याकाळी न विकले गेलेले कांदे, बटाटे आणि मिरच्या आणण्याचं ठरलं. आठवड्याभरानंतर खोपटातलं बरचसं सामान बाहेर काढलं जाऊन त्या जागी एक स्टोव्ह, चहासाठी आणि वडे तळण्यासाठी मोठी भांडी, झारा, गाळणे ह्यासारख्या बऱ्याच वस्तू आल्या. बाबू आणि लक्ष्मीला आता दिवस कमी पडू लागला.
पहाटे उठून लक्ष्मी चहा आणि बटाटेवडे बनवी. बाबू बनवलेले बटाटेवडे एका टोपलीत भरून शेजारी एका पिशवीत तळलेल्या आणि मीठ लावलेल्या हिरव्या मिरच्या ठेवी. सुमी पण सकाळी उठून आई ला जमेल तशी मदत करी आणि पहिल्या ट्रेन च्या आवाजाबरोबर "च्या- बटाटेवडं, च्या- बटाटेवडं" अशी आरोळी ठोकत बाबू थांबलेल्या ट्रेन कडं धावे. लक्ष्मी दिवसातनं तीन वेळा बटाटेवडे आणि चहा बनवी आणि उरलेल्या वेळात पुढल्या वड्यांसाठी बटाटे उकडणे, कांदा कापून ठेवणे असली कामं करी. पोटभरून खायला मिळाल्यानं सुमी आणि बऱ्यापैकी पैसे हातात आल्यानं बाबू आणि लक्ष्मी पण बरेच खुश होते. एकूणच सगळं कसं अलबेल चाललेलं होतं.
एके दिवशी संध्याकाळी बाबू अगदी थकून घरी आला तेव्हा लक्ष्मीनं विचारलं..
"काय झालं? आसं का सुकल्यागत त्वांड झालंय वं ?"
"लक्ष्मे आज सगळं वडं खाली पडल्यात बग."
"आरं देवा, कसं काय ओ?"
"आगं, लैच पळापळ व्हतीय बग. एका हातामंदी च्या चं पिंप, पेले आनं दुसऱ्या हातामंदी वड्याची टोपली. वरनं ह्यो तुटका पाय. गर्दीमधनं लैच त्रास व्हतोय."
लक्ष्मीच्या डोळ्यात एकदम पाणी तरळलं. एक तर शंभरभर रुपयांचा तोटा झाला होता आणि परत नवऱ्याची अशी दयनीय अवस्था बघून तिला काय बोलावं कळेना.
"म्या उद्यापासनं तुमच्यासंगट येत्ये. बिगीबिगी आटपून दोघं बी जाऊया. म्या 'च्या' इकीन आनं तुमी 'वडं' इका."
"आगं, पन तुला बी हिकडं काम असतंयच की"
"असुंदे, म्या करीन समदं."
दुसऱ्या दिवशी पासून लक्ष्मीपण बाबू बरोबर चहा घेऊन जाऊ लागली. मध्ये एका तासाची सुट्टी घेऊन ती खोपटाकडं येई आणि बटाटेवडे-चहा बनवी. सुमीनं तोवर भांडी घासून, बटाटे उकडून ठेवलेले असत. संध्याकाळी तिघं पण उरलेले गारढोण झालेले बटाटेवडे खाऊन आणि चहा पिऊन झोपी जात.
अश्याच एके दिवशी डब्यात चहा विकत असताना समोरच तिला गाडीचा 'टीसी' दिसला. तिला तो अजिबात आवडायचा नाही, ती गाडीत शिरली कि हा लक्ष्मीच्या जवळून जाण्याचा प्रयत्न करी. कधी तिच्या छातीला तर कधी कंबरेला हलकासा स्पर्श करी. पण त्याला काही बोललं तर परत आपल्याला गाडीत शिरता येणार नाही ह्या भीतीनं लक्ष्मी सगळं सहन करायची. त्या दिवशी डबा रिकामा असल्यानं तो सरळ सरळ लक्ष्मीच्या समोर येऊन उभा राहिला.
"काय गं, नाव काय तुझं?" त्यानं त्याची गिळगिळीत नजर वरपासून खालपर्यंत फिरवत विचारलं.
"लक्ष्मी, साहेब." बाजूला झालेला पदर एकसारखा करत लक्ष्मी बोलली.
"मग काय काय विकतेस तू?" विचकट हसत एक डोळा बारीक करत त्यानं विचारलं.
त्याच्या प्रश्नाचा रोख लक्षात घेत लक्ष्मी खालमानेनं बोलली "म्या 'च्या' इकते आनं माझ्या नवरा 'वडं' इकतो.' थोड्या लांबच एकाला वडे देत असलेल्या पण कोपऱ्यातून तिच्याकडंच बघत असलेल्या बाबूकडं बोट दाखवत तिनं म्हटलं.
तिच्या हाताकडं अजिबात लक्ष न देता, तिच्या छातीकडं बघत टीसी बोलला,
"फक्त चहाच विकतेस होय? पण मला मात्र दूध आवडत बुवा."
त्याचं बोलणं लांबूनच ऐकत असलेल्या बाबूनं झटक्यात पलीकडं नजर वळवली आणि लक्ष्मी देखील काहीच न बोलता मान खाली घालून तेथून सटकली. अश्या बऱ्याच नजरा, किळसवाणे स्पर्श अंगावर लेऊन लक्ष्मी घरी परते तेव्हा तिला स्वतःचा आणि तिच्या गरिबीचा भारी राग येई.
दिवस सरले, पैसे जमू लागले. पुढल्या वर्षी सुमीला नक्की शाळेत घालायचं ह्या विचारांनी लक्ष्मी फार खुश होती. एका रात्री मात्र फणफणुन ताप आल्यानं लक्ष्मीला उठायला पण येईना.
"उद्या एक दिस नको जायला लक्ष्मे, तुला बरं न्हायी तवा ह्ये समदं कोन बनवनार?" बाबूनं काळजीनं विचारलं.
"तुमी गप ऱ्हावा, आवं हातावरलं प्वाट आपलं, आसं खाडे करून कसं चालायचं? म्या समदं करून ठेवत्ये. पायजे तर तुमी उद्याचा दिवस सुमीला तुमच्या संगट घेऊन जावा."
ट्रेन मध्ये दिवसभर फिरायला मिळणार या कल्पनेनं सुमी खूप खुश होती. बऱ्याच उड्या मारून झाल्यावर तशीच हसत ती आईच्या कुशीत झोपी गेली. तिच्या डोक्यावर हात फिरवताना नेहमीसारखं लक्ष्मीच्या डोळ्यात आज पण पाणी आलं. 'आपल्या मुलीला खूप शिकवायचं, मोठ्ठ करायचं, आपल्यासारखं आयुष्य हिच्या वाटेला येऊ द्यायचं नाही' ह्या विचारातच लक्ष्मीला झोप लागली.
दुसऱ्या दिवशी सकाळी 'च्या घ्या च्या' हे चिमणे शब्द पहाटेच सगळीकडं किलबिलले. पहाटे गेलेले बापलेक दुपारी सगळं विकून परत आले पण सुमीच्या चेहऱ्यावर कुठंही थकवा वाटत नव्हता. ती आई बापाला ट्रेन मधल्या गोष्टी सांगण्यात मग्न होती. तास झाला तरी तिचा चिवचिवाट थांबेना. लक्ष्मीनं चहाचं पिंप भरून दिल्यावर क्षणातच ती उठली आणि समोर थांबलेल्या ट्रेन च्या डब्यात शिरली. तिच्या पाठोपाठ बाबू देखील आत शिरला.
संध्याकाळी बाहेर बापलेकीची वाट बघत खोपटाच्या दारात बसलेल्या लक्ष्मीला लांबूनच येणारा बाबू दिसला. पळत जाऊन तिनं आधी बाबुला विचारलं,
"आवं, सुमी कुठं हाये? तुमच्या संगटच गेली व्हती नव्हं?"
"म्हंजे, घरी आली न्हाय पोर? मला दिसली व्हती दुसऱ्या डब्यामदी. मला वाटलं उतरून हिकडं आली असंल."
"आरं देवा, कुठं गेली माझी सुमी? कुठं हरवून आलायसा तिला?" वेड लागल्यासारखं लक्ष्मी इकडंतिकडं पळू लागली. अख्या जगात आपल्या ९ वर्षाच्या पोरीला कुठं हुडकावं हे तिला कळेना.
"अरे ए बाबू, तुझी पोरगी तिकडं झुडपात पडल्या बग. आपल्या राम्यानं तिला चालत्या गाडीच्या डब्यातनं खाली पडताना बगितलं म्हनं " अर्ध्या तासानं शेजारच्या संपतनं पळत येऊन माहिती दिली.
अंधारात जवळपास एक मैल भरधाव पळत बाबू आणि लक्ष्मी त्या ठिकाणी पोचले. कुणीतरी सुमीला झुडुपातून बाहेर काढून शेजारच्या गवतावर झोपवलं होतं आणि तिला बघायला हू म्हणून गर्दी जमली होती. सगळ्यांना बाजूला सारत लक्ष्मी मध्यावर पोचली तेव्हा तिला तिथं बेशुद्ध पडलेली सुमी दिसली. तिला जवळ जाऊन कवेत घेण्यासाठी लक्ष्मी पुढं सरसावणार इतक्यात शेजारहून जाणाऱ्या ट्रेन च्या खिडकी आणि दरवाज्यातून येणाऱ्या प्रकाशात तिला सुमीच्या मांड्यांवरचे रक्ताचे ओघळ आणि रक्तानं बरबटलेला फ्रॉक दिसला. ते पाहून लक्ष्मी आहे तिथंच बसली, शेजारच्या गोंधळ करणाऱ्या माणसांचा आवाज तिला ऐकू येईना, डोळ्यातलं पाणी अचानक आटल्यासाखं तिला वाटलं. कालपर्यंत हवाहवासा वाटणारा धडधडत जाणाऱ्या ट्रेनचा आवाज, आज प्रत्येक क्षणी वाढत असणाऱ्या हृदयातील ठोक्यांच्या आवाजात एकरूप झाल्यासारखा तिला वाटला.
No comments:
Post a Comment