Saturday, November 3, 2018

श्रद्धा: मी अनुभवलेली

या गणपती उत्सवातली गोष्ट, माझा मुलगा वेदांत हा सात वर्षाचा आहे., मागल्या वर्षी पर्यंत तो कधी गणपती उत्सव किंवा बाकीच्या इतर सणांमध्ये एवढा भाग घेत नसे कारण त्याच सगळं लक्ष खेळण्यांमध्ये किंवा खाऊमध्ये असायचं पण या वर्षी पासून मात्र मी त्याला न चुकता मूर्ती कशी निवडायची, आरास कशी करायची  या सगळ्यात भाग घ्यायला लावला. या वर्षी गणपतीच्या मूर्तीपासून ते आरास करण्यासाठी लागणारं सामान आणि मोदकासाठी लागणाऱ्या तांदळाच्या पिठी साठी गिरणीत जाण्यापासून घराची स्वच्छता या आणि अश्या बऱ्याच गोष्टीसाठी त्याला मुद्दामहुन घेऊन गेले. हळूहळू त्यालाही या सगळ्यात इंटरेस्ट वाटू लागला. गणपती उत्सवाआधी एक दिवस मूर्ती घरी घेऊन आलो. त्यावेळी झालेला संवाद. 
तो: मम्मा , हा गणपतीचा फक्त statue आहे ना?
मी: अरे मूर्ती म्हणावं... 
तो: मग ह्या मूर्तीत देव आहे का?
मी: हो. 
तो: मग त्या मूर्ती विकणाऱ्याकडं एवढे सगळे देव कसे काय आले?
मी: (यावेळी उत्तर देताना अगदी विचार करत) अरे म्हणजे, आता जी आणली ना ती गणपती बाप्पाची मूर्तीच आहे, उद्या सकाळी आपण त्या मूर्तीची पूजा करून बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करणार. 
तो: म्हणजे?
मी: म्हणजे देवबाप्पाला सांगणार कि तुम्ही ह्या मूर्तीत या, म्हणजे आम्ही पाच दिवस तुमची सेवा करू शकू. 
तो: मग देवबाप्पा येणार का आपण सांगितलं म्हणून?
मी: हो येणार कि. 
तो: कुठून येणार?
मी: (आता कपाळावरचा घाम पुसत) त्याच्या मम्मा पपा कड राहतो ना तो, तिकडून येणार. 
तो: (थोडा वेळ विचार करत) बर मम्मा , मला उद्या लवकर उठव, मला देव बाप्पा मूर्तीत आलेला बघायचंय. 
मी: (बापुडी होत) बर , झोप आता. 

दुसऱ्या दिवशी हा लवकर उठून, अजिबात त्रास न देता आवरून पूजेला येऊन बसला. सगळी पूजा होईपर्यंत ह्याची  अविरत गडबड आणि बडबड सुरु होती, काही लागलं तर सगळ्या आधी स्वतः पळत जाऊन घेऊन  येणे, भटजींनी फुले वाहिली कि आपण पण वाहणे आणि प्रत्येक दहा मिनिटांनी मला किचन मध्ये येऊन विचारणे  "मम्मा , आला का गं देवबाप्पा?"
 शेवटी सगळी पूजा झाल्यावर देवबाप्पाला ह्यानंच नैवेद्य दाखवला. आणि पळत माझ्याकडं आला. 
"मम्मा , आता पूजा झालीय ना सगळी?
मी: हो झाली कि, आता माझ्या छोट्या भटजीला दक्षिणा आणि मोदक द्यायचे. 
तो: (माझ्या विषयांतराकडं अजिबात अक्ष न देता) म्हणजे गणपती बाप्पा आला ना मूर्तीत. 
मी: हो आला. 

त्यानंतर प्रत्येक पाच मिनिटांनी हा मूर्तीसमोर बसायचा, काहीतरी करायचा आणि परत यायचा. असं दोन तीन वेळा झाल्यावर मी हळूच बघितलं कि नक्की काय उद्योग चाललेत, तर साहेब नैवेद्याचे मोदक मोजतायत. 
मी: अरे मोदक कशाला मोजतोयस?
तो: मम्मा , अग  गणपती बाप्पा आलाच नाहीये आपल्या statue  मध्ये (परत मूर्ती वरून हा statue वर आला)
मी: कशावरून?
तो: अगं  तू थर्टी मोदक ठेवलेलेस ना, ते अजून पण तेवढेच आहेत. गणपती बाप्पानं  काहीच खाल्लं नाही, म्हणजे बाप्पा आलाच नाही. 

काल  पासून अति उत्साही दिसणारं  माझं पिल्लू आता खूप बावरल्यासारखं दिसत होतं. त्त्या जीवाला देवाचं अमूर्त्य आणि निर्गुण स्वरूप  कसं सांगावं हेच मला कळेना. त्याला आधी जवळ घेतलं आणि म्हटलं कि "अरे बाप्पा आपल्या घरी येतो, पाच दिवस आपल्यात राहतो पण तो दिसत नसतो कुणाला आणि तो असं आपल्यासारखं काही खात नसतो. देव बाप्पा आपल्याकडं येतो हि आपली "श्रद्धा" आहे."
तो: ते सगळं मला सांगू नकोस , देव बाप्पा आलाय कि नाही ते सांग. आलाय तर तो का खात नाहीये आणि नाही आला म्हणजे तू  खोटं  बोलत होतीस. उगीच माझ्याकडून सगळं काम करून घेतलंस. 
मी: हे बघ, जर तुझ्या मनात श्रद्धा आहे, तर देवबाप्पा आलाय
तो: आणि नसेल तर?
मी: जर श्रद्धा नाही तर मग नाही आला आणि हा फक्त statue च आहे. 

त्या दिवसापासून त्यानं एकूणच पूजेतील सहभाग कमी केला, जर थोडं रागावून त्याला बोलावलं तर म्हणायचा "उगाच त्रास नको देऊ मला, देव बाप्पा आलेलाच नाहीये, उगीच सगळे statue ची पूजा करताय." पण घरात इकडं तिकडं खेळताना मात्र अधून मधून हा चोरून मूर्तीकडे टक लावून बघायचा. 

शेवटी विसर्जनाचा दिवस आला. आज एवढी वर्षे झाली तरी पण गणपती उत्सवातील पाचवा दिवस मला आवडत नाही. सकाळपासून मूर्तीकडे माझं जास्तच लक्ष जातं, रोजच्यापेक्षा थोडं जास्तच वेळ मी तिथं रेंगाळते, चार दिवसात करत नाही तेवढ्यांदा मनातून नमस्कार करते.
तर घरी विसर्जनाची तयारी आणि चर्चा सुरु असताना वेदांत सगळं कान देऊन ऐकत होता. नंतर हळूच माझ्या मागं  येऊन म्हणाला, "मम्मा , गणपतीला पाण्यात नको टाकुयात"
मी काहीच बोलले नाही, संध्याकाळी ऑफिसातून लवकर घरी गेले तर काय, पिल्लू गाल फुगवून बसलेलं आणि सारखं म्हणत होतं कि गणपती बाप्पा राहूंदेत आपल्याकडंच. 
शेवटची आरती झाली, कितीही समजावलं तर हा काही येईना. गाडीतून आम्ही सगळे विसर्जनाच्या ठिकाणी पोचलो तर गाडीत पण हा रुसलेलाच होता. हैद्राबादला इथं जवळ नदी नसल्यानं एका तलावाजवळ विसर्जनासाठी तयारी करतात, cranes वगैरे अरेंज करतात. मी तर दर वर्षी गणपतीचं विसर्जनाच्या वेळी मनसोक्त रडते बुवा आणि माझी हि सवय माहित असल्यानं नवऱ्यानं एक हात माझ्या खांद्यावर आधीपासून ठेवलेला. आमच्या गणपतीबाप्पाला crane वर ठेवल्यावर मला काही पुढचं दिसेना, दृष्टी अंधुक झाली आणि डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागलं. वेदांत कुठं आहे म्हणून बघावं म्हणून थोडं आजूबाजूला बघितलं तर नवऱ्यानं दुसरा हात त्याच्या खांद्यावर ठेवलेला आणि माझं पिल्लू पण माझ्यासारखंच रडत होतं . घरी जाईपर्यंत आम्ही दोघेही शांत होतो, अगदी माझ्यासारखंच न जेवता माझं पिल्लू मला घट्ट पकडून झोपलं होतं. 
या गणपती विसर्जनाला मी गणपती बाप्पा जातोय म्हणून रडले कि माझ्या पिल्लुच्या डोळ्यातून एकसारखं येणारं पाणी अन त्यालाही न कळणाऱ्या पण मनातून जाणवणाऱ्या "श्रद्धेची" उकल झाली म्हणून रडले हे मला आजतागायत कळलं नाही. 




No comments: