Tuesday, November 6, 2018

राधा पुन्हा निघाली..

 राधा पुन्हा निघाली..  हि माझी कविता या वर्षीच्या तीन दिवाळी अंकांत छापून आली आहे. हि कविता आहे राधेची. कृष्ण राधेला सोडून निघून गेल्यावर बरीच वर्षे राधेने आपल्या कुटुंबाची काळजी घेतली. परंतु आता ती वृद्ध झाली आहे,  तीच मरण आता लवकरच येणार आहे आणि या जगातून निघून जाण्याआधी तिला एकदा कृष्णाला  बघायचे आहे. त्यासाठीच ती एकटी द्वारकेला निघाली आहे. हि कविता आहे त्याच प्रसंगाची...... 




आयुष्य खर्च झाले कर्मास न्याय द्याया
कर्तव्यपूर्ती केली वचनांसवे दिलेल्या
दृष्टी अधू तरीही नजरेत आस वाहे
कान्हा तुझ्याचसाठी देहात प्राण आहे
शरीरात त्राण नाही, गात्रे शिथिल झाली
कान्हा तुला बघाया राधा पुन्हा निघाली..

कानांत रोज घुमती ते बासुरीचे सूर
स्वप्नांत पाहते ती मनमोहना स्वरूप
स्वर्गीय रासलीला धुंदीत आज वाहे
पटलावरी स्मृतींच्या अजुनी जिवंत आहे
क्षण ते पुन्हा जगाया, इच्छा अगम्य झाली
कान्हा तुला बघाया राधा पुन्हा निघाली..

ही द्वारका म्हणू की प्रतिस्वर्ग हाच आहे
अतिभव्य ते नजारे दृष्टीस दीपताहे
अजुनी तुझ्या स्मृतीत प्रतिमा तिची आहे ना
रमलास रे मुकुंदा तव राज्ञांसवे का
हृदयात स्पंदनांची गती का दुणावत आहे
थांबू निघून जाऊ मन संभ्रमात आहे
उठले तरंग हृदयी, प्रीती फितूर झाली
कान्हा तुला बघाया राधा पुन्हा निघाली..

संदेश धाडला की कितीदा तरी तुला जो
ये रे मनोहरा रे बघ समय थांबला तो
रवी आज क्रुद्ध व्हावा का आग ओकताहे
महालासमोरी राधा डोळ्यात प्राण आहे
हृदयात अश्रू वाहे, चक्षुकमले म्लान झाली
कान्हा तुला बघाया राधा पुन्हा निघाली..

घुमतो भुवनी पावा निःशब्द सूर बोले
जन बोलती अचंबे कान्हास काय झाले
का पामरा कळावे हे सूर अकस्मात
युगांसवे चाललेली ही आपुलीच प्रीत
डोळे मिटूनी राधा, मग मंत्रमुग्ध झाली
कान्हा तुला बघाया राधा पुन्हा निघाली..

असतील हेच कान्हा बघ खेळ प्राक्तनाचे
विधिलिखिती का नसावे अल्प क्षण मिलनाचे
मुखकमल जरी न दिसले तरी चित्तहर्ष वाटे
सहस्र प्रीतिसुमने डोळ्यांत प्रेम दाटे
शांती अनामिका का, आत्म्यास आज झाली
कान्हा तुला बघाया राधा पुन्हा निघाली..


No comments: