Monday, September 24, 2018

रंग आयुष्याचे..

अरे किती प्रकारची माणसं असतात आपल्या भोवताली. फक्त रंग-रूप, जातपातच नाही तर हजारो स्वभावांच्या लाखो छटा असणारी. कधी राग, द्वेष तर कधी प्रेम आणि आदर यांचे बदलत जाणारे मुखवटे. कधी खरेपणात लकाकणारे तर कधी खोटेपणाच्या बुरख्यात काळवंडलेले. कधी कधी तर असं वाटत की आपलं आयुष्य म्हणजे मनाच्या कोऱ्या कागदावर विचारांच्या कुंचल्याने आणि भावनांच्या वेगवेगळ्या रंगांनी रंगवलेली चित्रेच जणू. अरे पण ही चित्रे पण कशी, तर हर  घडीला आपले रंग आणि आकार बदलणारी. आपण सगळेच चित्रकार अगदी जन्मल्यापासून सरणावर जाईपर्यंत. राग आणि द्वेषाचे  जहाल भडक रंग, दुःख आणि वेदनांचे उदास फिके रंग, सुख, आनंद आणि यशाचे हसरे जादूई रंग. मनाच्या कागदावर सगळेच रंग नागडे, एक तर एकमेकांवर कुरघोडी करणारे नाहीतर एकमेकांचे अस्तित्वच झाकोळून टाकणारे. आपण सगळेच आपलं आयुष्य घालवतो एक तर स्वतःची चित्रे रंगवण्यात, नाही तर दुसऱ्यांच्या चित्रांमध्ये आपले आवडते रंग हुडकण्यात; आणि जर आपल्याला आवडलेले रंग सापडले तर आपली बहरत जाणारी चित्रे आणि नाही सापडले तर अश्रूंच्या ओघात ओघळत जाणारे आपले तरल रंग. सगळं मिळून एवढीच काय ती आयुष्याची व्याख्या....

कधी तरी वाटतं बाहेर पडावं या सगळ्यातून, अगदी "नार्नीया" मधल्या कपाटाच्या दरवाज्यासारखं आपल्याला पण काही तरी सापडावं आणि मग आपण पण त्या पल्याडच्या जगात थोडं जगून बघावं. मला खूपदा एक स्वप्न पडतं कि मी सकाळी घराचा दरवाजा उघडून बाहेर पाय ठेवलाय आणि पायाला थंड मऊ आणि शुभ्र रेतीचा स्पर्श होतोय. वर बघितलं तर निरभ्र निळे आकाश आणि समोर अथांग समुद्र... तो पण निळाच बरं का.आणि मग वाटत कि हे सगळंच मागं सोडून अनवाणी पायांनी चालत जावं आणि बसावं किनाऱ्यावर, खूप खूप वेळ. मऊशार वाळूचा स्पर्श आणि पायांना गुदगुल्या करणारं  पाणी, लाटांच्या गर्जनेचा आवाज आणि घोंघावणारा खारट वारा . वाटतं , आपल्याकडचे सगळेच रंग आणि चित्रं फेकून द्यावीत समुद्राच्या पाण्यात आणि मनाच्या कोऱ्या कागदावर फक्त हुडकावं..... फक्त स्वतःला.






No comments: