Thursday, September 13, 2018

चंद्राचे मनोगीत

कशाला हसावे कशाला जगावे
कशासाठी अन्याय हा पार्थवा
असत्यास कवटाळुनी मी जगावे
कुणाला वदू माझी ही वंचना

निशेच्या कुशीतून जन्मास यावे
मला बागडाया तमाचे रण
कधी भेट नाही स्वतःच्या पित्याची
संबोधती सूर्य नारायण

नसावे मला का कधी स्वत्व माझे
पित्याने दिले दान तेजः कण
युगे लोटली आज आहे उभा मी
निशेला करोनि स्व ला अर्पण

सभोवताली अति क्षुद्र तारे
स्व प्रकाशे आनंदात तेजाळती
कधी सर्व एकत्र येऊनि मजला
कटू बोल बोलुनी वेडावती

जरी पृथ्वी लोकी अति मूल्य माझे
स्वतःसाठी आहे अति गौण मी
आकारे ही पूर्णत्व नाहीच मजला
रवीच्या प्रकाशे सदा अर्ध मी

नको ते अलंकार तेजः कणांचे
जयावीन मी न माझा उरे
नको ती स्तुती अन नको ती प्रशंसा
मला वाटते सर्व ते उपरे

असे याचना ही तुला पार्थवा रे
युगांची असे ही  खरी साधना
भूमंडलास निःशब्द करण्या स्व तेजे
नभी पेटवावे तमा एकदा



3 comments:

Unknown said...

Beautiful poetry ... extremely thoughtful and very well written :)

Unknown said...

फार आवडली कविता 👌🏻
फारच खोलात विचार करतेस पण😊

sharduli said...

Thanks a lot