गोव्याहून परत आल्यावर शांभवी खूप खुश होती, खूप सारी पैंटिंग्स, अथर्वंबरोबर मिळालेला भरपूर वेळ, त्याच्याबरोबर घालवलेले जादुई क्षण ह्यांनी मंतरलेले सात दिवस कसे गेले हे तिला कळलंच नाही. तसं  सांगायचं झालं तर तिच्या डोक्यात अमितच्या प्रस्तावाचं  काय करावं ह्याचे विचार चालूच होते पण तरीही कुठंतरी अथर्वने दिलेल्या आश्वासनामुळं ती निर्धास्त होती. शेवटी खूप विचार केल्यावर तिला हे पटलं  कि अथर्वने सांगितलेलं काही चुकीचं नाहीये. राहता राहिला अमितचा विचित्र स्वभाव तर त्यावर 'आपणच थोडं लांब राहिलं  तर आपल्याला त्रास नाही होणार, जर आपण कामापुरतंच बोललो तर थोड्या दिवसांनी सगळं ठीक होईल' असा विचार तिनं  केला.  परत घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी दुपारी तिनं अमितला फोन लावला.
"हॅलो अमित."
"शांभवी, तूच आहेस ना नक्की, काही स्वप्न वगैरे तर बघत नाहीये ना मी.. त्या दिवशी तू रागानं फोन ठेवून दिलास आणि  तू मला परत उभ्या आयुष्यात  कधीच फोन करणार नाहीस असं वाटलं होतं मला. बऱ्याचदा वाटलं कि फोन करावा पण धीर झाला नाही. खरं तर तुझी खूप आठवण ..... " पलीकडून अमितचा आवाज आला.
"अमित, थोडं थांबशील का बोलायचं? तुला काय वाटलं, कसं  वाटलं हे समजून घेण्यासाठी मी फोन केलेला नाहीये. हे बघ, तुझ्या प्रस्तावाबद्दल मी अथर्वशी बोलले. त्यानं सुचवल्याप्रमाणं आणि अर्थातच मला पण ते पटलेलं असल्यानं, मला असं वाटतं  कि मी तुझ्या प्रस्तावाचा विचार करावा." अमितचं बोलणं मध्ये तोडत अतिशय गंभीर आणि व्यवसायिकपणे  शांभवीने एका दमात सांगून टाकलं. 
"मला विश्वासच बसत नाहीये शांभवी कि तू होकार देतीयेस. मग कधी भेटूया? कुठं भेटूया? कि तू येतेस माझ्या ऑफिसला? सगळंच ठरवता येईल."
"थांब अमित, माझं अजून बोलून झालेलं नाहीये. हे अग्रीमेंट फायनल करण्याआधी माझ्या काही अटी  आहेत. एक तर एकदा मला काम आणि त्याची डेडलाईन दिल्यावर शंभरदा त्याबद्दल विचारलेलं आवडत नाही, दुसरं म्हणजे एकदा थीम काय आहे हे पक्कं  झाल्यावर  सारखं सारखं त्यामध्ये बदल केले तर मला चालणार नाही. हे बघ अमित, पैंटिंग्स करणं हे एक्सेल शीट मध्ये डाटा भरून रिपोर्ट बनवण्यासारखं नसतं. त्यात सारखे सारखे बदल नाही करता येत त्यामुळं  हवा तेवढा वेळ घे पण सगळं फायनल झाल्यावरच मी काम सुरु करेन."
"ठीक आहे, तू म्हणशील  तसेच होईल." यावेळेस मात्र अमितचा आवाज आधीसारखा उत्साही वाटला नाही.
"थँक्स अमित. मग तू संबंधितांशी बोलून सगळं फायनल झाल्यावर फोन कर. नंतरच भेटू आपण." असं म्हणून शांभवीने फोन ठेवून दिला.
शांभवीनं विचार केला, 'आपण उगाचच म्हणतो जग वाईट आहे, माणसं  स्वार्थी आहेत. खरं तर आपण संधी देतो लोकांना, त्यांना आपल्या आयुष्यात उगाचच जास्त शिरकाव करू देतो आणि नंतर आपणच देऊ केलेल्या संधीचा त्यांनी फायदा उठवला  कि रडत बसतो. आपण बरं  आणि आपलं काम बरं  असं राहीलं तर कुणीच आपलं वाकडं करू शकत नाही. अर्थात हे सगळ्या बाबतीतच खरं नसेलही पण तरीही जिथं शक्य आहे तिथं तरी असं वागणं आपल्याच हातात आहे.'   
जवळपास आठवड्यानंतर अमितचा फोन आला. ठरवल्याप्रमाणं त्यानं त्याच्या मॅनॅजमेन्टआणि टीमशी बोलून सगळं ठरवलं होतं. आता फक्त शांभवीला ते सगळं डोळ्याखालून घालायचं होतं. शांभवी त्यानंतर प्रत्येक  मीटिंग्सना हजर राहिली, पण अर्थातच तिनं  कामाचं सोडून बाकी कशातही लक्ष दिलं  नाही. आश्चर्य म्हणजे अमित पण तिच्याशी मागच्या वेळेसारखं काहीच बोलला नाही. कधी कधी शांभवीला वाटायचं आपल्या वागण्यामुळं हा बदलला आहे तर कधी अमितचं  कामात गुंतून जाणं  बघितलं कि वाटायचं कि कामाच्या बाबतीत अतिशय केंद्रित असल्यानं हा बोलत नाहीये. प्रदर्शनात बघितलेला अमित आणि इथं ऑफिसात कामात बुडालेला अमित हि अगदी दोन वेगवेगळी वव्यक्तिमत्वं होती. टीम ला समजावून सांगून, त्यांच्या अगदी छोट्या शंका कान  देऊन ऐकून, त्यांचं त्यांना कळेल अश्या पद्धतीनं निरसन करणे, कामाचा ताण वाटू नये अश्या पद्धतीनं हसून खेळून काम करून घेणे... डिजिमॅक्स ने एवढी प्रगती का आणि कशी केली असेल ह्याचं जिवंत  उत्तर तिच्या समोर होतं. काहीही असो पण अमित तिला पहिल्यांदा वाटलं तसा अजिबात नव्हता. हळूहळू शांभवीनं पण त्याच्याशी नॉर्मली वागा-बोलायला सुरुवात केली.
अश्याच एका दिवशी मीटिंगसाठी डिजिमॅक्स मध्ये आलेली शांभवी कॉन्फरन्स रूम मध्ये बसून फायनल झालेल्या थिम बघत होती. अचानक आपल्या मग कुणीतरी उभं आहे असं वाटून ती मागं  वळली आणि अमित ला बघून हसत म्हणाली "ये अमित, तुझ्या केबिनमध्येच येणार होते तुला भेटायला, तुझ्याशी या लोकेशन्स बद्दल बोलायच  आहे."
"बोल कि."
"आपण हि जी सगळी लोकेशन्स फायनल केली आहेत ती एकदम परफेक्ट आहेत, फक्त हे एकच सोडून."
"कुठलं?" अमितनं तिच्या लॅपटॉप मध्ये डोकावत बघितलं.
"सायलेंट व्हॅली  मध्ये असलेलं हे लोकेशन. खूप गर्द  झाडी आहेत सगळीकडं. इतकी दाट कि वर आभाळ दिसत नाही कि खाली जमीन. पैंटिंगमध्ये संपूर्ण कॅनवास भरून फक्त हिरव्या रंगाच्या चिक्कार शेड्स येणार."
"आणि तेच मला हवंय शांभवी. मला या पेटिंग मध्ये सगळे हिरवे रंग हवे आहेत, सगळ्या शेड्स हव्या आहेत आणि ह्या पेटिंग च नाव असेल 'दृष्टिकोन'. सध्या शब्दात सांगायचं तर हेच  बघ कि, आपलं आयुष्य पण असंच असतं नाही? रोज तोच दिनक्रम, तेच घर, आसपास असणारी तीच माणसं, त्याच जागा, अगदी थोडा थोडा फरक असतो प्रत्येक दिवसात. जर ढोबळमानाने बघशील तर किती एकसारखं आयुष्य जगतो आपण...अगदी या जंगलासारखं. पण थोडा दृष्टीकोन बदलून बघितला कि कळेल की हे सगळं अगदीच कंटाळवाणं नाहीये. वरवर दिसणाऱ्या त्या एकसारखेपणाच्या पण वेगवेगळ्या छटा आहेत आपल्या आयुष्यात. जरी एका परिघामध्ये बांधलेलं असलं तरी त्यात पण निराळेपण आहे. प्रत्येक हिरव्या छटेचं एक वेगळं अस्तित्व आहे किंवा असं म्हण हवं तर, कि ती छटाच त्या हिरव्या रंगाचं खरं अस्तिव आहे."
"किती खोलात विचार करतोस अमित. जेव्हा तुला पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हा खरं  सांगायचं तर खूप उथळ आणि कृत्रिम वाटलेलास मला. पण आता जेव्हा तुझ्यासोबत वेळ घालवला तेव्हा कळलं कि मी उगाचच  चुकीचा विचार करत होते. अथर्व म्हणाला तसा तू खूप हुशारच नाहीत तर मनानं  पण चांगला आहेस"
"हाहाहा.. म्हणजे? इतके दिवस  तू काय मला प्ले बॉय समजत होतीस कि काय? अगं, तुला थोड्या वेळापूर्वी म्हणालो ना, तशी माझ्या आयुष्याच्या कॅनवास वर तुझ्या रूपानं एक नवीन छटा शोधत होतो मी, बाकी काही नाही. आयुष्य तर वर्षानुवर्षे असंच चाललंय आणि असंच चालणार. नवनवीन माणसं येतात आणि त्यांच्या छटांनी आपलं सो कॉल्ड कंटाळवाणं आयुष्य रंगीत बनवतात. माझा स्वभाव ह्या ऑफिस बाहेर खूप वेगळा असतो कारण असं दिवसरात्र खूप गंभीर राहायलाच येत नाही मला. सगळ्या गोष्टीत जर मी गंभीर राहायला लागलो तर लवकरच भिंतीवरच्या फोटो फ्रेम मध्ये बसावं लागेल.  तुझ्याशी दोन वेळा बोलल्यावर कळलं कि तू माझ्या विरुद्ध आहेस, खूप वेगळी आहेस, तुला हे सगळं नाही पटत आणि मग मी पण सोडून दिलं कारण मला तुझ्याशी फक्त मैत्री करायची होती. तुला त्रास द्यावा किंवा तुला न पटणारं काहीही बोलावं किंवा वागावं  असं माझ्या कधीच मनात नव्हतं."
"सॉरी अमित, तुला ओळखू शकले नाही मी. तुझ्या वरवरच्या स्वभावाला बघून तुझ्या बद्दल नाही नाही ते आडाखे बनवले मी."
"अगं बाई सॉरी वगैरे म्हणू नको. मला जाम  टेन्शन येतं या सॉरीचं . "
"ठीक आहे नाही म्हणत सॉरी. पण आपल्या मैत्रीचं सेलेब्रेशन करायला संध्याकाळी ऑफिस नंतर कॉफी घेशील माझ्याबरोबर? बघूया, माझ्या आयुष्यात हि नवीन छटा किती शोभून दिसते ते."
"नक्कीच मॅडम. आय एम ऑल युवर्स." अमित हसत हसत उत्तर दिले. 
त्या दिवशी सुरु झालेली मैत्रीची छटा हळूहळू एवढी दाट  होत गेली कि त्या छटेनं शांभवी आणि अमितचा सगळं कॅनवास व्यापून टाकला.
अमित केतकर.. जिवंत व्यक्तिमत्वाचं एक  ज्वलंत उदाहरण. अमितच्या बरोबर असलं कि तुम्हाला उदास व्हायला, विचार करायला आणि शांत बसायला परवानगीच नाही जणू. एवढ्या वर्षांत शांभवी एवढा वेळ पहिल्यांदाच हसली असेल. जेवढा वरवर जॉली दिसायचा त्याहूनही अधिक खोल विचार करणारा, सगळ्यांची काळजी करणारा अमित. सकाळी गुड मॉर्निंग पासून रात्री गुड नाईट पर्यंत मेसेजेस ने शांभवीचं आयुष्य व्यापणारा, रोज न चुकता कॉल करणारा, आठवड्यातून दोनदा शांभवीला हक्कानं  भेटणारा अमित. अमितच्या रूपानं तिला एक खूप जवळचा मित्र मिळाला. शांभवीला आता एकटं वाटायचं नाही. अमित तिला एकटं  वाटूच द्यायचा नाही. या मैत्रीखातर अगदी अगदी आपलेपणानं आमंत्रण दिल्यानं  शांभवी अमितच्या घरी पण जाऊन आली. त्याची बायको इशा खूप मनमिळाऊ आणि मुलगा अनिश गोड  होता. दोघांशी तिची खूप छान मैत्री जमली. मग वेळ मिळेल तेंव्हा ती सान्वी ला घेऊन अमित च्या घरी जाई. सगळे मिळून मस्त मजा करत, फिरायला जात, खरेदीला एकत्र जात. . कधी एखाद्या रविवारी अमित, इशा आणि अनिश शांभवीकडं  येत. अथर्व आणि अमितची ड्रिंक्स पार्टी, इशा आणि शांभवीची गप्पा पार्टी तर सान्वी आणि अनिश ची दिवसभर धमाल चाले. एकूणच काय अगदी दृष्ट लागावी असं सगळं चाललं होत.  
-----
"चल शांभवी, आज खूप थकलोय मी. घरी लवकर निघतोय." मीटिंग रूम मध्ये बसलेल्या शांभवीला अमित म्हणाला.  अमितच्या चेहऱ्यावरून त्याला होत असलेला त्रास स्पस्ट जाणवत होता.
"काय झालं अमित?"
"अंग, डोकं आणि अंग  जाम  दुखतंय. ताप  येणार बहुतेक."
"चल मग डॉक्टर कड जाऊयात आधी"
"अगं नको, घरी जाऊन झोपतो थोडा वेळ. बरं वाटेल.
"ठीक आहे, मी पण निघतेय आता. चल तुला घरी सोडून मगच पुढं मी घरी जाईन."
"नको शांभवी. मी जाईन एकटाच."
"वेडा आहेस का अमित? या अवस्थेत तू गाडी  कशी चालवशील? मला काही ऐकायचं नाही. तू गपचूप माझ्याबरोबर चल."
हम्म. ठीक आहे" शांभवीला विरोध करण्याइतकी शक्ती पण अमित मध्ये नव्हती.
घरी पोचल्यावर बघितलं तर दरवाजा बाहेरून लॉक होता. "हे काय, इशा कुठं गेली?" शांभवीने विचारलं.
"सांगायचं राहिलंच तुला. ती तिच्या मम्माकडं  गेलीय. दोन दिवसांनी येईल. तू काळजी करू नको. मी पडतो जाऊन. तू पण निघ आता..
"थोडं गप्प बसणार का तू अमित?" म्हणत शांभवीन लॅच उघडला. "तू फ्रेश हो, मी मस्तपैकी गरम कॉफी बनवते तो पर्यंत." असं म्हणत ती किचनमध्ये घुसली सुद्धा.
दहा मिनिटांत दोन मग मध्ये कॉफी घेऊन ती बेडरूम मध्ये पोचली तर अमित गाढ झोपला होता. अंगाला हात लावून बघितलं तर खरंच ताप  चढला होता. त्याला उठवून तिनं आधी  कॉफी प्यायला  लावली आणि औषध दिलं.
अमित परत झोपी गेल्यावर बराच वेळ ती हॉल मध्ये काहीतरी वाचत बसली होती. ईशाला फोन करून तिलाही अमितच्या तब्ब्येतीबद्दल सांगितलं. ईशा दुसया दिवशी पहाटेच निघून सकाळी दहा पर्यंत घरी पोचणार होती. जर ताप उताराला नसेल तर डॉक्टरला बोलवायचं असं ठरवून तिनं आत जाऊन बघितलं तर अमितचा ताप बऱ्यापैकी उतरला होता. रात्रीसाठी अमितला खायला काहीतरी बनवून ठेवावं आणि मग घरी निघावं असा विचार करत उठून किचन कडं निघणार तेवढ्यात मागून अमितचा आवाज आला "शांभवी कुठं निघालीस?"
"अरे अथर्व उठलास होय?" शांभवीनं माग वळून उत्तर दिलं. "अरे तुझ्यासाठी काहीतरी खायला  बनवण्यासाठी  निघाले होते. थोडं खाऊन घे म्हणजे बरं  वाटेल तुला."
"तू माझ्याजवळ बसलीस तर मला जास्त बरं  वाटेल.'
"हो, पण आधी काहीतरी खायला घेऊन येते."
"नाही,आधी इकडं जवळ येऊन बस." लहान मुलासारखं गाल फुगवून अमितनं असं म्हटल्यावर शांभवीला हसू आलं. ती परत मागं  वळून अमितिच्या शेजारी जाऊन बसली आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला म्हणाली,
" बोल, काय झालं? डोकं दाबून देऊ का? "
"शांभवीचा हात आपल्या हातात घेऊन अमित म्हणाला " नको, फक्त एवढंच कर कि मला सोडून कुठं जाऊ नको."
"हो रे बाबा, मी कुठं जाणार आहे?" 
बराच वेळ अमितशी इकडचं तिकडचं बोलून झाल्यावर शांभवीनं वरण भाताचा कूकर लावला. ताप पण बऱ्यापैकी उतरला होता. अमितच्या हट्टाखातर दोघांनी मिळून जेवण केलं आणि मग ते  थोडा वेळ टीव्ही बघत बसले. अथर्व घरी नसल्याने तिला तशी काही घरी जायची गडबड नव्हती. आज उशीर होईल हे सांगायला तिनं  इंदूला फोन केला तेव्हा कळालं कि सान्वी नुकतीच झोपी गेली आहे. रात्रीचे नऊ वाजल्यावर मात्र शांभवी अमितला म्हणाली, "बर निघते मी आता अमित, खूप उशीर झालाय."
"थांब अजून थोडा वेळ, खरंच मला एकट्याला सोडून जाऊ नको." असं म्हणत अमितनं तिला घट्ट मिठी मारली. का कोण जाणे पण शांभवीन मिठीतुन बाहेर पडायचा प्रयत्न केला नाही. ती तशीच बसून राहिली. 
पाच मिनिटांनंतर मिठी आणखी घट्ट होत गेली आणि अमितनं आपले ओठ तिच्या ओठावर टेकवले. 
"अमित, काय करतोयस?" शांभवीनं विचारल आणि त्याला हलकेच बाजूला केलं.  पण त्या कृतीमध्ये प्रतिकार नव्हता, त्या शब्दांमध्ये विरोध नव्हता. 
"आज काहीही बोलू नको शांभवी, प्लीज.  फक्त एकदा, माझ्यासाठी." असं म्हणत अमितनं तिला परत मिठीत घेतलं. 
नियती म्हणा किंवा विधिलिखित म्हणा, आपण कितीही बदलायचा प्रयत्न केला तरी 
बदलले जात नाहीत. उलट दैवाचे फासेच असे पडतात कि आपल्याला नक्की काय होतंय, का होतंय, जे होतंय ते योग्य कि अयोग्य, त्याचा परिणाम काय होणार ह्या सगळ्याचं  विश्लेषण करण्याचा पुरेसा वेळही न मिळता सगळं अचानकच बदलत जातं, आपल्याला काही कळायच्या आधी आपण एका गूढ गर्तेच्या मध्यावर पोचलेलो असतो. आजूबाजूला डोळे उघडून बघितलं कि ह्यातून बाहेर पडावंसं वाटतं पण  कुठंतरी खोल आतमध्ये  गुरुत्वाकर्षण एवढं जास्त असतं  की  आपण त्यात ओढले जातो... आपल्याही नकळत. 
अशाच एका अज्ञात दुबळ्या क्षणी अमितच्या  मिठीत शांभवीसोबत सभोवतालची रात्र पण विरघळत गेली.
क्रमशः
(अस्वीकरण: ह्या कथेतील सर्व पात्रे, प्रसंग, घटना आणि विचार हे निव्वळ 
काल्पनिक आहेत. केवळ मनोरंजन म्हणून त्या स्वीकाराव्यात आणि वाचाव्यात.)