Wednesday, October 31, 2018

मी "अतिरेकी"

प्रसंग पहिला:
वय वर्षे ८: मी तिसरी चौथीत असेन त्यावेळी. पाचव्या दिवशी घरच्या गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर अनंतचतुर्दशीपर्यंतच्या कुठल्यातरी एका रविवारी आई बाबा मला आणि माझ्या भावाला सांगलीला फिरायला आणि देखावे बघायला घेऊन जात. सांगलीत पोहोचल्यावर दुपारी चार वाजता बाबा आम्हाला मसाला डोसा खायला घालत आणि त्यानंतर गणपती मंदिरात जाऊन नंतर सगळीकडचे देखावे बघायला सुरुवात होई. त्या वर्षी पण देखावे बघायला सुरु  केल्यावर थोड्या वेळांनंतर मला भूक लागली म्हणून बाबांनी एक किलो पापडी मला आणि भावाला खाण्यासाठी घेऊन दिली. एक किलोचा पूडा हातात आल्यावर आम्हा दोघांची अविरत चरंती सुरु झाली. जर आपण फार  हळू हळू खाल्लं तर भावाला जास्त पापडी खायला मिळेल आणि पापडी पण संपेल ह्या भीतीनं मी पण खायचा स्पीड वाढवला. थोड्याच वेळात पापडीचा पूडा संपलाही. सगळे देखावे बघून झाल्यावर शेवटच्या बसने आम्ही घरी पोचलो. रात्री मला काही झोप लागेना. शेवटी रात्री दोन च्या सुमारास अंथरुणातच भडाभडा उलटी झाली. त्या दिवसापासून मला खूप आवडणाऱ्या पापडीबद्दल माझ्या मनात इतकी शिसारी निर्माण झाली कि आजतागायत मी पापडी खात नाही. 

प्रसंग दुसरा: 
वय वर्षे १३: मी सहावी सातवीत असतानाची गोष्ट. मे महिन्यात सगळ्यांच्या घरी चैत्रागौरी बसायच्या आणि शेजार पाजारच्या बायका हळदी कुंकवाला बोलवायच्या . गौरीची आरास, डाळीची कोशिंबीर, भिजवलेले काळे हरभरे आणि कैरीचं पन्ह यासाठी मी पण आई बरोबर सगळीकडं हळदीकुंकवाला जायचे. त्या वर्षी पण घरच्या हळदीकुंकवासाठी बनवलेली कोशिंबीर आणि पन्हे पोटभर हादडल्यावर परत सगळीकडं हळदीकुंकवाला आई बरोबर निघाले. जवळपास सात-आठ घरी बनवलेली वेगवेगळ्या प्रकारची कोशिंबीर आणि पन्हे खाऊन पिऊन  झाल्यावर त्या रात्री पोटात काहीतरी जाम 'केमिकल लोच्या' झाला आणि पोटातल्या कोशिंबीर आणि पन्ह्यानं पोटातून बाहेर येण्यासाठी बंड पुकारलं. त्यांच्या विनंतीला मान  दिल्यांनतरच मला त्या रात्री झोप आली. त्या पुकारलेल्या बंडाचा विरोध म्हणून असेल पण आजही मी डाळीची कोशिंबीर, भिजवलेले काळे हरभरे आणि पन्ह्याला हातही लावत नाही. 


प्रसंग तिसरा: 
वय वर्षे अठ्ठा..... (बायकांनी वय सांगू नये म्हणतात):  तर पनीर हा माझा वीक पॉईंट. जेवायला बाहेर गेलं तर स्टार्टर मध्ये पनीर, मेन कोर्स मध्ये पनीर पराठा, पनीर करी, पनीर बिर्याणी.. असं माझं पनीर प्रेम. तर हा किस्सा तेव्हाचा ज्या वेळी मी बेंगलोरला जॉब करत होते. भारतातल्या फूड, टेक्सटाईल आणि लेदर कंपन्यांची ऑडिट्स आणि इन्स्पेक्शन करण्याचं काम असल्यानं सारखं फिरायला मिळायचं. तर त्या वर्षी तामिळनाडूच्या तिरूपूर या ठिकाणी एका टेक्सटाईल कंपनीमध्ये ३१ डिसेम्बरला सरप्राईस  इन्स्पेक्शन ठरवलं होतं. ३१ ला रात्री जवळपास ११ वाजता माझी परतीची बस होती.तिरूपूर हे टेक्सटाईल हब असल्याने कपडे अगदीच स्वस्त. तर संध्याकाळी काम संपल्यावर कपडे खरेदी करावी आणि तिथूनच बस पकडावी म्हणून मी ६ वाजता काम संपल्यावर खरेदीला निघाले. खरेदी संपल्यावर काहीतरी खाऊन घ्यावं म्हणून तिथल्याच एक चांगल्या पंचतारांकित हॉटेलात गेले (पैसे कंपनी देणार होती ना म्हणून). तर ३१ डिसेंबर असल्याने त्यांनी मुख्य रेस्टॉरंट बंद ठेवले होते आणि बाहेर गार्डन मध्ये काही प्रोग्रॅम्स आणि कॉकटेल पार्टी चालली होती. जेवणाची सुरुवातही झालेली नव्हती त्यामुळं मी त्यांना फक्त माझ्यासाठी त्या मेनू मधील कुठलीही एक पनीर ची करी आणि रोटी घेऊन यायला सांगितली. एका मोठया हंडीमध्ये वेटरनं शाही पनीर करी आणली. काजू बदाम यांची ग्रेव्ही आणि वरून केसर, पिस्ता घातलेली पनीर करी आणली आणि नेहमीसारखी मी ती पोट भरून खाल्ली. ताटात काही सोडायचं नाही हे शिकवल्यामुळं आणि अर्थातच पनीर मनापासून आवडत असल्यानं शेवटची अर्धी उरलेली करी पण नुसतीच चमच्याने खाल्ली. नशिबानं त्या रात्री बसमध्ये उलटी झाली नाही पण त्यांनतर पनीर समोर दिसलं कि त्या रात्रीची घटना, त्या थोड्या "जास्तच" शाही असलेल्या पनीरचा वास माझ्या नाकात येतो. पनीर आता मी अजिबात खात नाही. 

----------

"अति तेथे माती" या उक्तीचा आयुष्यात तीन वेळा अनुभव आलेला आहे. लहापणी आज्जी आजोबा, नंतर आई बाबा, नंतर नवरा आणि आता मुलगा पण "थोडं कमी खा", अन्न  काही पळून जात नाही हवं तर थोड्यावेळाने किंवा उद्या उरलेलं खा" असं म्हणत असतात. ह्या आणि ह्यासारख्या अनंत सूचना लहानपणापासून ऐकत आल्यानं आणि खाण्याबाबतीत  मी एवढा अतिरेक करत असल्यानं कुठंतरी माझ्या रक्तात "अतिरेक्या" चा Gene  असल्याची मला खात्री झालेली आहे. त्यावर बऱ्याचदा नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न फोल ठरल्याने अजूनही मी भरली वांगी, बासुंदी, भजी , काजू कतली  ह्या आणि ह्यासारख्या अनेक खाद्यपदार्थांचा अत्यंत हिंसात्मक पद्धतीनं खातमा करून त्यांचा फडशा पडत असते. 

दिवाळी आठवड्यावर आलीय. आत्तापर्यंत सगळ्यांच्या घरी फराळाची तयारी सुरु झाली असेल. साखरेचे, डाळीचे आणि इतर रोजच्या वापरातले डबे रिकामे करून त्यांची जागा आता फराळाच्या पदार्थांनी घेतली असेल. दिवाळीच्या चार दिवसांचा मेनू पण ठरवला गेला असेल. ह्या दिवाळीत आपण सर्वांनीही आपल्या "अतिरेकी" पणाला योग्य तो न्याय देऊन दिलखुलास आणि पोटफुलास हाणावे. फक्त ही आणि येणारी प्रत्येक दिवाळीच  नाही तर आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना जे हवे, जसे हवे, जितके हवे तेवढे मनसोक्त खायला मिळण्याएवढे आरोग्य, समृद्धी आणि संपत्ती लाभो हीच देवाचरणी अपेक्षा. आपणा सर्वाना दिवाळसणाच्या "अतिरेकी" आणि पोट फुटेपर्यंत शुभेच्छा.   



No comments: